जि.प. अध्यक्षपद | भाजपकडून सदस्य वळवून बदलली सत्तासमीकरणे; युतीच्या चर्चांना वेग.
दैनिक दर्पन वृत सेवा. पांडुरंग गायकवाड....
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीआधी जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याची चर्चा आहे. गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही शिवसेना एकत्र येत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र होते. मात्र शेवटच्या टप्प्यात भाजपने जोरदार रणनीती राबवत ठाकरे गटातील दोन सदस्यांना आपल्या बाजूला घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
या घडामोडीनंतर ठाकरे सेनेसमोर पर्याय कमी पडल्याने अखेर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडूनही भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले गेल्याची चर्चा असून त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपची स्थिती अधिक भक्कम झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान, या राजकीय हालचालींमुळे नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र येत अध्यक्षपद निश्चित करण्यासाठी युती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी राज्य पातळीवरही हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्तरावर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली असून, शेवटच्या क्षणी बदललेल्या राजकीय गणितामुळे अध्यक्षपदाची लढत एकतर्फी होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली तरी जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणे मोठ्या प्रमाणात बदलल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे

No comments:
Post a Comment