निरोप नव्हे… मनाच्या गाभाऱ्यातील ओलावा.

  


सुभाषराव देशमुख : शब्दात न मावणारे मुख्याध्यापक, सेवापूर्ती सोहळा

प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी

उगवत्या सूर्याला सर्वजण नमस्कार करतात; पण मावळत्या सूर्यालाही तितक्याच आदराने वंदन करण्याचे संस्कार फार थोड्यांकडे असतात. कारण उगवता सूर्य आशा देतो, तर मावळता सूर्य आठवणी देतो. आणि आठवणी म्हणजे केवळ क्षणांचे तुकडे नसतात; त्या असतात आयुष्याला दिशा देणाऱ्या, व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या आणि मनाच्या गाभाऱ्यात कायमस्वरूपी घर करणाऱ्या. आज आपण अशाच एका भावनिक आणि अभिमानास्पद क्षणाचे साक्षीदार आहोत. आदरणीय मुख्याध्यापक सुभाषराव देशमुख यांच्या सेवानिवृत्तीचे.

हा दिवस केवळ एका पदाचा शेवट नाही; तो एका दीर्घ, समर्पित आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरव आहे. “सुभाषराव देशमुख” हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो शांत, संयमी, शिस्तप्रिय आणि अंतःकरणाने अत्यंत मृदू शिक्षक. त्यांच्या डोळ्यांतील आत्मविश्वास, चेहऱ्यावरचे साधेपण आणि शब्दांतील स्पष्टता यांनी हजारो विद्यार्थ्यांचे जीवन उजळले. दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ ची ती सकाळ. सूर्यकिरणांनी घर उजळून निघाले होते. हवेत हलकीशी थंडी, मनात प्रसन्नता आणि दिवसाची शांत सुरुवात. मोबाईलवर आलेले संदेश पाहताना अचानक एक ओळ नजरेत भरली, मेहकर तालुक्यातील घाटबोरी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे “आदरणीय मुख्याध्यापक सुभाषराव देशमुख आज सेवानिवृत्त होत आहेत.” त्या एका वाक्याने काळ जणू क्षणभर थांबला. मन भरून आलं. डोळ्यांत पाणी दाटलं. आनंद, अभिमान, कृतज्ञता आणि हलकीशी वेदना, सगळ्या भावना एकाच वेळी मनात दाटून आल्या.

वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षपुर्ण करीत सर शासकीय सेवेतून निवृत्त होत होते. पण ‘निवृत्ती’ हा शब्द त्यांच्या बाबतीत अपुरा वाटतो. कारण त्यांनी कधीही केवळ नोकरी केली नाही; त्यांनी शिक्षणाला आयुष्याचे ध्येय मानले. त्यांचा प्रत्येक दिवस विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अर्पण केलेला होता. इतक्यात फोन वाजला. श्री, दांदडे सरांचा आवाज होता. “भाऊ, आज देशमुख सरांचा सेवानिवृत्ती समारंभ आहे. आपण नक्की या.” फोन ठेवताच मनात निर्णय झाला, हा क्षण चुकवायचा नाही. ही केवळ उपस्थिती नव्हती; ही कृतज्ञतेची वेळ होती. वेळ कमी होती. पैशांची अडचणही होती. क्षणभर मनात संभ्रम आला; पण लगेच विचार पक्का झाला, आदराला किंमत नसते. घाईघाईत बाजारात जाऊन सरांसाठी कपड्यांचा उत्तम जोड घेतला. ताईंकरिता साडीचोळी घेतली. हातात भेटवस्तू आणि मनात अपार प्रेम घेऊन शाळेकडे निघालो.

शाळेच्या आवारात पोहोचताच वातावरणाने मन भारावून गेले. फुलांनी सजलेला परिसर, विद्यार्थ्यांची उत्साही किलबिल, शिक्षकांची लगबग आणि गावकऱ्यांची गर्दी, सगळीकडे भावनांचा एक वेगळाच सोहळा सुरू होता. जणू काही शाळेच्या भिंतीही आज आठवणी सांगत होत्या. प्रत्येक वर्गखोली, प्रत्येक बाक, प्रत्येक झाड, सर्व काही त्यांच्या कार्याची साक्ष देत होते. देशमुख सरांनी शाळेला केवळ प्रशासन दिले नाही; त्यांनी तिला संस्कारांची ओळख दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक प्रगती साधली, निकालात सातत्याने वाढ झाली, विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. पण यशाच्या आकड्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात प्रामाणिकपणा, शिस्त आणि कष्टाची सवय रुजवली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कठोरता आणि माया यांचा सुंदर संगम होता. वर्गात उशीर करणाऱ्या विद्यार्थ्याला ते समज देत; पण त्याच विद्यार्थ्याच्या घरची परिस्थिती समजल्यावर त्याला आवश्यक ती मदत करत. त्यांच्या कठोर शब्दांमध्येही काळजी दडलेली असे. विद्यार्थ्यांना त्यांची भीती नव्हती; त्यांना आदर होता. ते नेहमी म्हणत, “आपण फक्त विषय शिकवत नाही; आपण माणूस घडवत आहोत.” या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण शिक्षणदृष्टीचा सार दडलेला होता. त्यांच्या कार्यकाळात शाळेत वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन असे अनेक उपक्रम राबवले गेले. प्रत्येक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असे. ते केवळ आदेश देणारे प्रमुख नव्हते; ते स्वतः कामात सहभागी होणारे मार्गदर्शक होते. पालकांशी संवाद साधताना ते अत्यंत संयमी आणि समजूतदार असत. “घर आणि शाळा एकत्र आल्यावरच मुलांचे भविष्य घडते,” असे ते नेहमी सांगत. त्यांच्या या दृष्टिकोनामुळे शाळा आणि गाव यांचे नाते अधिक दृढ झाले. कार्यक्रम सुरू झाला. विद्यार्थ्यांनी भावपूर्ण गाणी सादर केली. शिक्षकांनी आठवणी सांगितल्या. प्रत्येक आठवणीत प्रेम आणि आदर ओसंडून वाहत होता. मंचावर बसलेले सर शांतपणे सगळं ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं; पण डोळ्यांत भावनांचा सागर दाटला होता. मी पुढे जाऊन त्यांना भेटवस्तू दिली. शब्द अपुरे पडले. फक्त वंदन करून मनातील कृतज्ञता व्यक्त केली. सरांनी हळूच म्हटलं, “तुमचं प्रेम हीच माझी खरी संपत्ती आहे.” त्या एका वाक्याने मन अधिकच भरून आलं. त्यांनी गळाभेट दिली. त्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू आणि माझ्या डोळ्यांत दाटलेलं पाणी, त्या क्षणाने सगळं काही सांगून टाकलं. आज हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी आहेत. त्यांच्या यशामागे सरांनी दिलेला आत्मविश्वास आहे. त्यांनी शिकवलेली मूल्ये आजही जिवंत आहेत. त्यांनी पेरलेली बीजे आता मोठ्या वृक्षांसारखी फुलली आहेत. आज आपण त्यांना निरोप देत नाही; आपण त्यांच्या कार्याचा गौरव करत आहोत. त्यांनी आपल्याला शिकवले की महानता पदात नसते; ती आचरणात असते. आदर हा मागून मिळत नाही; तो कर्मातून मिळतो. शिक्षक हा केवळ कर्मचारी नसतो; तो संस्कारांचा शिल्पकार असतो. आजचा हा निरोप दुःखाचा नाही; तो कृतज्ञतेचा आहे. मनात ओलावा आहे; पण त्यात अभिमान अधिक आहे. कारण आपण अशा व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात राहिलो, ज्यांनी आपल्याला माणुसकी, शिस्त आणि समर्पणाची खरी शिकवण दिली. आदरणीय सुभाषराव देशमुख सर, आपल्या कार्याची ज्योत सदैव उजळत राहो. आपण रुजवलेली मूल्ये पिढ्यान्पिढ्या फुलत राहो. आपल्या शिकवणीची छाया विद्यार्थ्यांच्या जीवनात कायम राहो. हा निरोप नाही; हा मनाच्या गाभाऱ्यातील ओलावा आहे. हा एका आदर्श शिक्षकाला अर्पण केलेला कृतज्ञतेचा नम्र प्रणाम आहे.

संतोषजनक लेखणीतून...

संतोष अवसरमोल (पत्रकार/ लेखक) 

मु.पो. घाटबोरी, ता. मेहकर, जि. बुलढाणा 



No comments:

Post a Comment