स्थानिकांच्या पुढाकाराने तुंबलेल्या नाल्या मोकळ्या
प्रतिनिधी महागाव अक्षय डोंगरे
महागाव : शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये साचलेल्या घाणीच्या प्रश्नावर अखेर स्थानिकांनी पुढाकार घेत नालीसफाई मोहीम राबविली. अनेक दिवसांपासून नाल्या तुंबलेल्या असल्याने परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली होती. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर श्याम तायवाडे, साहेब राव कांबळे (युवा फोर्स अध्यक्ष), गोलू कावळे, गुडू भैय्या सांगडे व दीपक तायवाडे यांनी पुढाकार घेत प्रत्यक्ष नालीसफाईचे काम हाती घेतले. साचलेला कचरा, गाळ व प्लास्टिक काढून नाल्या मोकळ्या करण्यात आल्या. स्थानिक युवकांनीही यात सहभाग नोंदविला.
प्रभागातील नागरिकांनी सांगितले की, नाल्या तुंबल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. ही समस्या गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतानाही प्रशासनाने वेळेवर लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला.
“नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र वारंवार सांगूनही कार्यवाही होत नसल्याने आम्हालाच पुढे यावे लागले,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. पुढील काळातही दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, नालीसफाईनंतर परिसरात स्वच्छतेचे चित्र दिसू लागले असले तरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिक आता प्रशासनाकडून नियमित स्वच्छता व देखभालीची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

No comments:
Post a Comment