जत येथील लिंगायत समाज दफनभूमीसाठी जत नगरपरिषदेणे वीस एकर जागा उपलब्ध करून द्यावी सामाजिक कार्यकर्ते, चंद्रकांत उर्फ पापा कुंभार.
प्रतिनिधी - मोहसिन इनामदार
उमराणी रस्त्याशेजारील पत्रा कॉलनीजवळील लिंगायत स्मशानभूमीची दुरावस्था. याकडे नगराध्यक्षानी लक्ष देण्याची लिंगायत समाजाची मागणी. जत उमराणी रस्त्याशेजारील पत्रा कॉलनीजवळ लिंगायत स्मशानभूमी असून येथील लिंगायत समाजाचे सामाजिक कार्यकर्ते करबसय्या स्वामी यांनी आपली स्वतःची साडेचार एकर जमीन लिंगायत स्मशानभूमीकरिता दिली आहे. जत शहरात लिंगायत समाजाची मोठी संख्या असतानाही या समाजाच्या स्मशानभूमी समस्याकडे आतापर्यंत कोणीही लक्ष दिले नाही. ज्या वेळी लिंगायत समाजातील व्यक्ती मृत पावते त्यावेळी त्या व्यक्तीला दफन करताना जो खड्डा काढला जातो त्या वेळी एखाददूसरा पुरलेला मृतदेह या खड्ड्यात आढळून येतो अशी या स्मशानभूमीची अत्यंत केविलवानी व दयनीय अवस्था आहे. त्याचप्रमाणे या स्मशानभूमीला असलेल्या प्रवेशद्वाराची लोखंडी दरवाजेही चोरीस गेले आहेत. या स्मशानभूमीत सर्वत्र घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. समाजाची एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीला दफन करण्यासाठी या ठिकाणी आणल्यानंतर समाजबांधवाना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या लिंगायत स्मशानभूमीत सर्वत्र काटेरी झुडूपे उगवून आली आहेत. लाईट च्या पोलवरील लाईट बंद असल्याने रात्रीच्यावेळी या ठिकाणी मृतदेहावर अंत्यविधी करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. येथील पत्रेही चोरीला गेले आहेत. या ठिकाणी पाण्याची कसलीही व्यवस्था नाही. सर्वत्र दुरावस्थाच दिसून येत आहे. लिंगायत समाजातील व्यक्तीला मृत्यूनंतरही दुर्गंधीचा त्रास सोसावा लागत असून जत नगरपरिषद प्रशासनाने लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी जत नगरपरिषद हद्दीत वीस एकर जागा उपलब्ध करून द्यावी व यासाठी जतचे लिंगायत समाजाचे नेते व नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांनी पुढाकार घ्यावा व लिंगायत समाजाला न्याय द्यावा अशी मागणीही लिंगायत समाजाचे नेते सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment