कपिलधारमध्ये ‘आपदा मित्र–सखी’ उपक्रमाची दमदार सुरुवात ; ग्रामसुरक्षेसाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची सज्ज फौज तयार
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मार्गदर्शनाखाली पाच दिवसीय प्रशिक्षण; युवक-युवती आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रतिनिधी सोयगाव.. दिलीप मोरे...
कपिलधार येथे ११ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बीड येथे आयोजित करण्यात आलेले ‘आपदा मित्र–सखी’ प्रशिक्षण ग्रामसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. आपत्ती आली तर घाबरायचे नाही, तर सज्ज होऊन नागरिकांचे प्राण वाचवायचे, या ध्येयवाक्याने प्रेरित होत युवक, युवती, महिला व मच्छीमार बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
हा उपक्रम National Disaster Response Force (एनडीआरएफ) यांच्या मार्गदर्शनाखाली, National Disaster Management Authority, State Disaster Response Force आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर प्रशिक्षित स्वयंसेवकांची फळी तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
प्रशिक्षणादरम्यान आपत्ती प्रतिसाद दलाचे डेप्युटी कमांडंट अशोक कुमार यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधत आपत्तीच्या काळात नागरिकांची भूमिका किती महत्त्वाची असते, यावर मार्गदर्शन केले. पाचव्या तुकडीतील निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी बचावकार्याची तांत्रिक माहिती देत प्रशिक्षणार्थींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. सहायक निरीक्षक खुंटे यांनी दोरीच्या साहाय्याने बचाव, पूरस्थितीत सुटका, प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन समन्वय यांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी ग्रामपातळीवरील सज्जतेचे महत्त्व अधोरेखित केले. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी चंद्रकांत शेळके यांनी प्रशासन आणि नागरिकांतील समन्वयाची गरज स्पष्ट केली, तर उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी महिलांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले.
या प्रशिक्षणात प्राथमिक उपचार, हृदयपुनरुज्जीवन प्रक्रिया (CPR), पूरस्थितीतील बचावकार्य, दोरीच्या साहाय्याने सुटका तंत्र, संप्रेषण व्यवस्था, बचावनौकेचा वापर व नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर या विषयांवर सैद्धांतिक व प्रात्यक्षिक मार्गदर्शन देण्यात आले. शनिवारी बचावनौकेच्या प्रात्यक्षिकाने विशेष आकर्षण निर्माण केले.
नोडल अधिकारी सुहास हजारे यांच्या कुशल नियोजनामुळे प्रशिक्षण शिस्तबद्ध आणि परिणामकारक पार पडले. महसूल व ग्रामपातळीवरील अधिकाऱ्यांनीही समन्वय साधत उपक्रम यशस्वी केला.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून भविष्यात आपत्तीच्या प्रसंगी प्रशासनासोबत कार्य करण्याची जबाबदारी ते पार पाडतील. ग्रामीण भागात पूर, दुष्काळ, आग किंवा अपघातांच्या घटनांमध्ये पहिला प्रतिसाद देणारी स्थानिक यंत्रणा निर्माण होणे ही या उपक्रमाची मोठी जमेची बाजू ठरणार आहे.
कपिलधारमधील हा उपक्रम ग्रामसुरक्षेच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरत असून “सज्ज ग्राम, सुरक्षित समाज” हा संदेश प्रभावीपणे देणारा ठरला आहे. स्थानिक पातळीवर सज्ज स्वयंसेवकांची फौज उभी राहिल्याने भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम आणि जलद होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment