गावठी दारूचा कहर २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू, आमनी गावात संताप उसळला

 



प्रतिनिधी अक्षय डोंगरे, महागाव

महागाव तालुक्यातील आमनी गावात गावठी दारूचा उघडउघड धंदा सुरू असून त्याचे भीषण परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वर्गीय प्रकाश अमरसिंग जाधव (वय अंदाजे २८ वर्षे) यांचा संशयित गावठी दारू प्राशनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


गावात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे गावरान दारू तयार करून विक्री केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दिवसाढवळ्या दारूची विक्री, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मैफली आणि तरुण पिढीचा वाढता व्यसनाधीनपणा हे चित्र चिंताजनक आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.


प्रकाश जाधव हा कुटुंबातील आधारस्तंभ होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “दारू विक्रेते मोकाट फिरत आहेत आणि निष्पाप कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही वेळ आल्याचा सूर ग्रामस्थांतून उमटत आहे.


गावातील महिलांनीही संताप व्यक्त करत दारूबंदीची जोरदार मागणी केली आहे. आता तरी पोलिसांनी जागे व्हावे, अन्यथा गावकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे. बेकायदेशीर दारूचा साठा तात्काळ जप्त करावा, संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करावेत आणि या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


आमनी गावात गावठी दारूचा वाढता महापूर थांबवला नाही, तर आणखी जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस प्रशासनाने केवळ औपचारिक तपास न करता ठोस मोहीम राबवून हा बेकायदेशीर धंदा कायमचा बंद करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


एका तरुणाच्या मृत्यूने संपूर्ण गाव हादरले आहे. आता प्रश्न एकच आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?


No comments:

Post a Comment