देवगाव फाटा रस्त्यालगत आढळला मृतावस्थेतील बिबट्या.



प्रतिनिधी  : गणेश ठाकरे लासलगाव 

निफाड तालुक्यातील देवगाव फाटा रस्त्यालगत दत्तू कोंडाजी बोचरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ९६/२ मधील शेतात आज (दि.२४) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे देवगावसह परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिकू फळबाग परिसरात काम करणाऱ्या  कामगारांना बिबट्या पडलेल्या अवस्थेत दिसून आला. सुरुवातीला परिसरात बिबट्याची हालचाल असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती; मात्र जवळ जाऊन पाहणी केल्यानंतर तो मृत अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ ही माहिती वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे , वनपरिमंडळ अधिकारी जयप्रकाश शिरसाठ, वनरक्षक विजय दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक बचाव पथक निफाड सदस्य ज्ञानेश्वर पवार, सादिक शेख, वैभव दौंड, विजय माळी, काशिनाथ माळी, शरद चांदोरे, सागर दुसिंग,  भारत माळी,  वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून आवश्यक ती खबरदारी घेतली. त्यानंतर मृत बिबट्याचा पंचनामा करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार सदर बिबट्या अंदाजे ५ ते ६ वर्षांचा नर जातीचा असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच त्याबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे.

पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय वाहनाद्वारे येथीलच पशुवैद्यकीय अधिकारी, श्रेणी – १, डॉ.अमोल दराडे यांच्याकडे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणी अधिक तपास वनविभागामार्फत करण्यात येत आहे. उपसरपंच लहानु मेमाने, पोलीस पाटील सुनील बोचरे, ग्रामपंचायत सदस्य किशोर बोचरे, अण्णासाहेब बोचरे चांगदेव बोचरे, रामु बोचरे, आदी उपस्थित होते.

दरम्यान, अलीकडील काळात परिसरात बिबट्यांच्या हालचाली वाढल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी विशेषतः सायंकाळनंतर व रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या जागी एकटे जाणे टाळावे, तसेच वन्यप्राण्यांची हालचाल आढळल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment