दादा, तुमचा निर्णय चुकला… माघारी या’; सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक”

 



प्रतिनिधी 

 मुंबई: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत दादांच्या आठवणींना उजाळा दिला. “गेली २२-२३ वर्षे आम्ही एकत्र काम केले. आज आपल्या सहकाऱ्याबद्दल शोकप्रस्तावावर बोलण्याची वेळ आली आहे, हे अत्यंत दुःखद आहे. अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही,” असे शिंदे म्हणाले.

“देवेंद्रजी आणि मी मित्र गमावला”

शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “ज्या दिवशी दादा गेले, त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. नियतीसमोर ते हरले. लाखो अनुयायांना ते पोरके करून गेले. पवार कुटुंबावर काळाने घाला घातला.” स्वतःच्या वैयक्तिक दुःखाचा उल्लेख करत ते म्हणाले, “मीही अपघातात माझी दोन मुले गमावली आहेत. माझे गुरु आनंद दिघे यांनाही अपघातात गमावले. त्यामुळे हे दुःख काय असते, मला ठाऊक आहे. देवेंद्रजी आणि मी एक मित्र गमावला आहे.”

अभ्यासू, शिस्तप्रिय आणि कठोर निर्णय घेणारा नेता

अजित पवारांच्या कार्यशैलीबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, “प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता आपण गमावला आहे. त्यांच्या हातात फाईल गेली की काय कमी आहे, हे ते लगेच सांगायचे. बैठकीत साधा कागदाचा तुकडा पडला तरी चालत नसे. ते शब्द आणि वेळेला प्रचंड महत्त्व देणारे होते.” कोरोना काळात मंत्रालयात जाऊन काम करणारे ते मोजके नेते होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. सरकार स्थापनेच्या चर्चेदरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वतःहून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले होते, ही आठवणही त्यांनी सांगितली.

“मुख्यमंत्री होण्याचे भाग्य नशिबाने हिरावले”

“दुर्दैवाने अजितदादांना मुख्यमंत्री होता आले नाही. नशिबाने साथ दिली असती तर ते नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. राजकारणात मतभेद असतात, पण ते अजातशत्रू होते. त्यांनी खिलाडूपणा जपला,” असे शिंदे म्हणाले. पहाटे पाच वाजता अधिकाऱ्यांना बोलावून कामे आटोपणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. “आमचे सरकार २४/७ काम करणारे होते. त्यांनी कधीच कामात तडजोड केली नाही,” असेही त्यांनी नमूद केले.

“दादा, तुमचा निर्णय चुकला…”

भावनांनी दाटून आलेल्या स्वरात शिंदे म्हणाले, “दादा म्हणजे स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा पाळणारा नेता. आज सभागृहात पाहताना ते डोळ्यासमोर उभे राहतात आणि वाटते – दादा, तुमचा हा निर्णय चुकलेला आहे, माघारी या.” सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी स्वीकारली असून, “आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. विकास आता लांबणार नाही, थांबणार नाही,” अशी ग्वाही देत शिंदे यांनी भाषणाचा समारोप केला.

No comments:

Post a Comment