सापडलेली १ लाख ६० हजार रुपयांची सोन्याची पोत केली परत
दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे संत भोलागिरी महाराज यांच्या आयोजित हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभात सापडलेली १ लाख ६० हजार रुपयांची सोन्याची पोत एका युवकाने परत करीत प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला. त्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.
सोन्याची नऊ पानांची मनी असलेली पोत, अंदाजे १ लाख ६० हजार रुपये किमतीची, यात्रेदरम्यान एका युवकाला सापडली होती. ही मौल्यवान वस्तू देवस्थान संस्थांचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे बंधू माधव पाटील यांना मिळाली होती.आजच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडलेले असताना, इतकी मौल्यवान वस्तु स्वतःजवळ न ठेवता त्यांनी तात्काळ ही बाब संस्थानच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आयोजकांकडून सर्वत्र त्वरित जाहीर आवाहन करण्यात आले की, संबंधित व्यक्तीने योग्य ओळख पटवून पोत स्वीकारावी. सदर आवाहन ऐकल्यानंतर तसेचतपासणीनंतर ती सोन्याची पोत शंकर बेले यांची असल्याचे स्पष्ट झाले. योग्य खातरजमा करून ती पोत त्यांना परत देण्यात आली. अशा घटनेमुळे सोडेगावमध्ये प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श समोर आला आहे. पैशाच्या व सोन्याच्या मोहापेक्षा सचोटी, नीतीमत्ता आणि समाजाप्रती जबाबदारी मोठी असते, हे माधव पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
आजच्या भौतिकवादी युगात अशा प्रकारची इमानदारी दुर्मिळ होत चालली आहे. दरम्यान, अशा घटनेमुळे समाजात अजूनही सद्सद्विवेकबुद्धी जिवंत असल्याचा विश्वास दृढ झाला आहे. संतांच्या पुण्यतिथीच्या पवित्र सोहळ्यात घडलेली ही घटना संतांच्या शिकवणीचीच साक्ष देणारी ठरली. सोडेगाव ग्रामस्थांकडून माधव पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांचा हा आदर्श समाजातील तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. सचोटी आणि इमानदारी हाच खरा माणसाचा खजिना आहे याची जाणीव करून देणारी ही घटना प्रत्यक्ष घडली आहे.
No comments:
Post a Comment