सभागृहात बहुमताचा झटका १२-० ने सत्ता उलथली नगराध्यक्षांना अखेर पायउतार व्हावे लागले
प्रतिनिधी महागाव अक्षय डोंगरे
महागाव नगरपंचायतीत पुन्हा एकदा सत्तेचा मोठा स्फोट झाला असून चार वर्षांच्या सत्ताकाळात दुसऱ्यांदा राजकीय उलथापालथ झाली आहे. काँग्रेस महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षा सुनंदा दिलीप सुरोशे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव तब्बल १२ विरुद्ध ० मतांनी पारित झाला. या निकालानंतर नगराध्यक्षांना अखेर पायउतार व्हावे लागले.
अविश्वास प्रस्तावाच्या मतदानापूर्वीच नगरपंचायत परिसरात दोन्ही गटांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. समर्थकांच्या गर्दीमुळे कार्यालय परिसराला अक्षरश जत्रेचे स्वरूप आले होते. वातावरणात तणाव स्पष्ट जाणवत होता.गटनेते शैलेश सुरोशे कोपरकर यांनी आपल्या आईचे नगराध्यक्षपद वाचवण्यासाठी पराकोटीचा प्रयत्न केला. राजकीय संपर्क, समन्वय, बैठका अशा सर्व हालचाली केल्या गेल्या. मात्र विरोधकांची एकजूट भक्कम ठरली आणि अखेर त्यांना तोंडघशी पडावे लागले.
पराभव अटळ असल्याचे लक्षात येताच कोपरकर गटाने सभागृहातून काढता पाय घेतल्याची चर्चा रंगली. नगराध्यक्षा सुनंदा सुरोशे कोपरकर, गटनेते शैलेश सुरोशे कोपरकर, नगरसेविका सुरेखा विनोद कोपरकर, रुपाली संतोष कोल्हेकर आणि नगरसेवक महेश पाटील हे मतदानावेळी अनुपस्थित होते.काँग्रेस गटनेते शैलेश कोपरकर यांच्या मनमानी कारभारामुळे विरोधक आधीच बिथरले होते. मात्र धक्कादायक बाब म्हणजे सत्तेत सोबत असलेल्या काही नगरसेवकांचाही विश्वास त्यांनी गमावल्याचे स्पष्ट झाले.
भाजपाचे गटनेते गजानन साबळे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश नरवाडे, रंजना दीपक आडे, आशा शंकर बावणे, शिवसेनेचे नगरसेवक तथा विद्यमान उपनगराध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे, रामराव नरवाडे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल प्रकाश पांडे, सुनीता शिवाजी डाखोरे, करुणाताई नारायण शिरबिरे तसेच काँग्रेसचे परवेज शफी सुरैया, जयश्री अशोक इंगोले, जयश्री संजय नरवाडे या सर्वपक्षीय बारा नगरसेवकांनी एकत्र येत नगराध्यक्षांविरोधात कंबर कसली.
शेवटी पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी अविश्वास प्रस्ताव १२ विरुद्ध ० मतांनी मंजूर झाल्याची अधिकृत घोषणा केली आणि नगरपंचायतीत सत्ताबदलावर शिक्कामोर्तब झाले.या निकालाने महागावच्या राजकारणात खळबळ उडाली असून पुढील नगराध्यक्ष कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चार वर्षांत दुसऱ्यांदा सत्तांतर झाल्याने स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महागावच्या राजकारणात आता नवे समीकरण आकार घेणार का? की पुन्हा एकदा सत्तेचा खेळ रंगणार?
राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे.

No comments:
Post a Comment