शिवडी येथे महाविद्यालयीन युवकावर बिबट्याचा हल्ला; तर कोठुरे येथे एक बिबट्या जेरबंद परिसरात भीतीचे वातावरण
वार्ताहर :- गणेश ठाकरे लासलगाव
निफाड तालुक्यातील शिवडी येथे जिल्हा परिषद वस्तीशाळेजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवार दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजता वाबळे वस्तीवरील प्रितम प्रविण वाबळे (वय १७) या महाविद्यालयीन युवकावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
शिवडी शिवारातील चारी क्रमांक १४ लगत असलेल्या वाबळे वस्तीवर प्रितम वाबळे हा शेतातील शेडलगत काम करत असताना पाठीमागून बिबट्याने अचानक झडप घालत डाव्या मांडीला चावा घेतला. जवळच शेतात काम करत असलेले संजय वाबळे व गोरखनाथ शिंदे यांनी तत्काळ धाव घेऊन प्रितम याची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. स्थानिक नागरिक जमा होताच बिबट्या लगतच्या गव्हाच्या शेतात पळून गेला.
जखमी प्रितम वाबळे याला उगाव येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी निफाड येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी विजय दोंदे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच जिल्हा परिषद शिंदे वस्तीशाळेजवळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. यावेळी माजी उपसरपंच संजय शिंदे, रोशन शिंदे, अशोक वाबळे, प्रविण वाबळे, महेश शिंदे, रामदास शिंदे, तेजस शिंदे, अमोल दरेकर, राजेंद्र वाबळे, नानासाहेब शिंदे, शिवाजी शिंदे, ज्ञानेश्वर सानप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थी व पालक दहशतीखाली
शिवडी परिसरात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर असून यापूर्वी मेंढ्या, शेळ्या व कुत्रे अशा पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र बुधवारी प्रथमच थेट युवकावर हल्ला झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

No comments:
Post a Comment