लासलगाव ग्रामपंचायतीची ‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये गरुडझेप
विभागीय स्तरावर ५० लाखांचे बक्षीस जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार सन्मान.
प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
निफाड तालुक्यातील लासलगाव ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानात विभागीय स्तरावर यश मिळवले आहे. दहा हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या गटात लासलगाव ग्रामपंचायतीची निवड झाली असून ग्रामपंचायतीला ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
‘माझी वसुंधरा’ हे भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांवर आधारित पर्यावरण संरक्षणाचे एकात्मिक अभियान असून दि.२ ऑक्टोबर २०२० पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. राज्यातील २८,३१७ स्थानिक स्वराज्य संस्था या अभियानात सहभागी झाल्या आहेत. लासलगाव ग्रामपंचायतीने यापूर्वी ऑनलाईन सेवांबाबत राज्यपालांच्या हस्ते गौरव मिळवला असला तरी विभागीय स्तरावर बक्षीस मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. सन २०२४/२५ मध्ये राबविण्यात आलेल्या या अभियानाचा पाया तत्कालीन सरपंच अफजल शेख व ग्रामविकास अधिकारी एल. जे. जंगम यांनी घातला होता. पंचमहाभूतांवर आधारित प्रकल्पांची अंमलबजावणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व ऑनलाईन अपलोडिंग ही कामे शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली. अभियानाच्या अंतिम टप्प्यात विभागीय तपासणी समितीच्या दौऱ्यावेळी विद्यमान सरपंच योगिता पाटील व अधिकारी एस. एच. बाविस्कर यांनी प्रभावी सादरीकरण करून प्रत्यक्ष तपासणी यशस्वीपणे पार पाडली.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत आयोजित पारितोषिक वितरण समारंभ शनि दि.२१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे होणार आहे. या कार्यक्रमास विविध मंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या यशासाठी सरपंच योगिता पाटील, उपसरपंच रामनाथ शेजवळ यांच्यासह सदस्य जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील, अफजल शेख, चंद्रशेखर होळकर, अश्विनी बर्डे, अमिता ब्रम्हेचा, अमोल थोरे, सायली पाटील, दत्ता पाटील, सुवर्णा जगताप, रेवती होळकर, पुष्पा अहिरे, संगीता पाटील, संतोष पालोड आणि ज्योती निकम तसेच तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी एल. जे. जंगम व विद्यमान अधिकारी एस. एच. बाविस्कर व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment