अपघातानंतर मोटारचालक महिलेने एकाला फरफटत नेले; मोटार चालक महिला अटकेत
पुणे : संगमवाडी ते येरवडा रस्त्यावर किरकोळ अपघातानंतर मोटारचालक महिलेने एकाला फरफटत नेले. समाज माध्यमातून या घटनेची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोेलिसांनी मोटारचालक महिलेला अटक केली. या प्रकरणी मोटारचालक महिला मेरसेदे रसुलीफर (वय ४५) हिला अटक करण्यात आली. या घटनेत राम लक्ष्मण राठोड (वय ३४) हे जखमी झाले. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालक महिला शनिवारी (१७ जानेवारी) येरवड्यातील सादलबाब दर्गा रस्त्याने संगमवाडीकडे निघाली होती. त्या वेळी तेथून निघालेल्या मोटारचालक राम राठोड याच्याबरोबर किरकोळ अपघातानंतर वाद झाला. राठोड याने मोटार थांबवून मोटारचालक महिला मेरसेदे हिला मोटारीतून बाहेर येण्यास सांगितले. तिने मोटार सुरू ठेवली. मोटारीच्या समोर राठोड थांबले. मोटार सुरू ठेवल्याने राठोड यांनी मोटार अडविण्याचा प्रयत्न केला. मोटारचालक महिलेने मोटार पुढे नेली. प्रसंगावधान राखून राठोड यांनी बोनेट धरून ठेवले. मेरसेदे हिने मोटार दोन किलोमीटर पुढे नेली. या घटनेची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली.
ॲड. असीम सरोदेंच्या कार्यालयाच्या आवारात चंदन चोरी
ॲड. असीम सरोदे यांच्या कार्यालयाच्या आवारातून चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ॲड. असीम सरोदे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, ॲड. सरोदे यांचे विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका सोसायटीच्या आवारात कार्यालय आहे. कार्यालयाच्या आवारात चंदनाची झाडे आहेत.
सोमवारी मध्यरात्री चाेरटे सोसायटीच्या आवारात शिरले. चोरट्यांनी चंदनाची दोन झाडे कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ॲड. सरोदे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. . पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.
शहर परिसरात चंदन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. बंगले, सोसायटीचे आवार, शासकीय, शैक्षणिक संस्थांच्या आवारात शिरुन चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली आहेत. गेल्या वर्षी विधी महाविद्यालय रस्ता परिसरात चंदन चोरट्यांनी गस्त घालणाऱ्या पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चंदन चोरटा जखमी झाला होता. जखमी अवस्थेत चोरटा पसार झाला होता. पोलिसांनी तपास करुन चंदन चोरट्यांना अटक केली होती.
.jpeg)
No comments:
Post a Comment