निफाड तालुक्यात सामाजिक परिवर्तनाची क्रांती: ११७ ग्रामपंचायतींमध्ये 'एकल महिला सन्मान' सोहळा संपन्न
प्रतिनिधी : श्री. गणेश ठाकरे लासलगाव
समाजातील विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटीत महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी आणि शतकानुशतके चालत आलेल्या अनिष्ट प्रथांना मूठमाती मिळावी, या उद्देशाने निफाड तालुक्यातील सर्व ११७ ग्रामपंचायतींमध्ये आज 'एकल महिला सन्मान' हळदी-कुंकू सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे तालुक्यात सामाजिक परिवर्तनाचे नवे पर्व सुरू झाले आहे.
"अनिष्ट प्रथांना फाटा आणि सन्मानाची नवी नांदी"
पतीच्या निधनानंतर पत्नीचे जोडवे काढणे, मंगळसूत्र काढणे किंवा कुंकू पुसणे यांसारख्या अमानवी आणि स्त्रीच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या प्रथा बंद करणे, हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. पारंपारिक रुढी-परंपरांना फाटा देत, गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये एकल महिलांना सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी हा विशेष पुढाकार घेण्यात आला.
लासलगांव व चांदोरी येथे विशेष सोहळा
ग्रामपंचायत चांदोरी येथे आयोजित कार्यक्रमात निफाडच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, "हा केवळ प्रशासकीय उपक्रम नसून सामाजिक परिवर्तनाचे अभियान आहे. विधवा महिलांचे मानवी हक्क अबाधित ठेवणे आणि कुप्रथांना ठाम नकार देणे ही काळाची गरज आहे." यावेळी मंचावर बालविकास प्रकल्पाधिकारी आरती गांगुर्डे, सायखेडा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. संदीप घुगे, डॉ. सारिका डेर्ले, सरपंच विनायक खरात, उपसरपंच छाया जाधव, ग्रामविकास अधिकारी सुरेश भांबारे यांसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
प्रशासकीय नियोजन आणि सक्षमीकरण
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी तालुक्यातील सर्व सरपंचांना आणि ग्रामपंचायत प्रशासनाला विशेष सूचना दिल्या होत्या. या उपक्रमामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा कर्मचारी, बचत गट सदस्य,उमेद आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर प्रचार करून शेकडो महिलांचा सहभाग निश्चित केला. यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणावर भर देण्यात आला.
या कार्यक्रमामुळे निफाड तालुक्यातील या क्रांतीकारी पावलामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. "महिलांचा सन्मान जपूया – माणुसकी जपूया" हा संदेश घराघरात पोहोचल्याने एकल महिलांच्या आयुष्यात आत्मसन्मानाचा नवा प्रकाश निर्माण झाला आहे.श्रीमती. नम्रता जगताप गटविकास अधिकारी पंचायत समिती निफाड

No comments:
Post a Comment