खरीप हंगाम आटोपला, आता लग्नगाठ बांधण्यासाठी धावपळ...!!!
:- जितेंद्र गोंडाणे कुही प्रतिनिधी,
कुही : पूर्वीच्या तुलनेत विवाह संबंधात कमालीचा बदल घडवून आला आहे. विवाह जोडण्याची संकल्पनाच मुळात बदलली आहे. जुन्या प्रथेनुसार डिसेंबर, जानेवारी या महिन्यांमध्ये लग्न जुळवणे, लग्नगाठ बांधून ठेवणे, साक्षगंध व लग्न सोहळ्यांनाही सुरुवात होते. खरीप हंगाम आटोपला असून, उपवर मुला-मुलींसह स्थळ शोधण्याच्या कार्यक्रमाला आता चांगलाच वेग आला आहे.
सध्याच्या स्थितीत भरपूर शेती असणाऱ्या, नोकरी करणाऱ्यांना व मोठा व्यवसाय असलेल्या वरांनाच प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते. शिवाय, वधू पित्याच्या अपेक्षाही खूपच वाढलेल्या असल्याने यावर्षी सुद्धा अल्पशेती, शेतमजूर, कामगार व छोटा व्यवसाय असलेल्या वर मुलांना मुली मिळणे कठीण आहे. अलीकडे, जोडीदार निवडताना मुलींपेक्षा मुलींच्या पालकांनाच सरकारी नोकरी हवी, शेती हवी किंवा मोठा व्यवसाय असलेलाच जावई पाहिजे असतो. त्यामुळे सामाजिक समस्येची जटिलता वाढत जात आहे. आधुनिक युगात शेतीला कनिष्ठ दर्जा दिला जात असला तरी, एक स्थावर मालमत्ता म्हणून शेती तर हवीच हवी, असा वधू पालकांचा अट्टाहास वाढलेला दिसत आहे. शिवाय, मुलींच्या अपेक्षाही खूप वाढल्या आहेत.
उच्चशिक्षित, सुंदर, निर्व्यसनी, घरंदाज, कमावता पती मिळावा अशी त्यांची इच्छा पराकोटीला गेली आहे. यामुळे शेतमजूर, कामगार, बेरोजगार, छोटा व्यवसाय असलेल्या वरांची फार कुचंबना होत आहे. ही परिस्थिती मागील काही वर्षांपासून निर्माण झाल्याने उपवर मुलांच्या बाबतीत मोठा गहण प्रश्न बऱ्याच समाजात निर्माण झाला आहे.
*(ग्रामीण भागातील उपवर मुले वधूसाठी भटकंती करीत असल्याचे चित्र सर्वदूर दिसत आहे.)*
*प्रेमविवाहाच्या संख्येतही होतेय वाढ*
सर्वसाधारण गरीब मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने काही मुले सर्वसाधारण किंवा चांगल्या सुख-संपन्न घरातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळून जाऊन लग्न करीत असल्याच्या प्रकारातही मोठी वाढ झाली आहे.

No comments:
Post a Comment