निफाड तालुक्यातील श्री मतोबा महाराजांच्या मूर्ती व दानपेटीची चोरी; नैताळे शहर स्वयंस्फूर्तीने बंद



प्रतिनिधी. —  श्री. गणेश ठाकरे लासलगाव 

नाशिक जिल्ह्याचे व नैताळेकरांचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मतोबा महाराजांच्या मंदिरातून चांदीच्या सुमारे तीन किलो वजनाच्या दोन मूर्ती आणि दानपेटीची अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री सुमारास चोरी केली. या प्रकारामुळे ग्रामस्थांत तीव्र संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी चोरट्यांना पकडून कठोर कारवाई करेपर्यंत संपूर्ण नैताळे शहर आज स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या नैताळे (ता. निफाड) येथे दरवर्षी पौर्णिमेला १५ दिवसांचा भव्य यात्रोत्सव भरतो. या काळात लाखो भाविक श्री मतोबा महाराजांच्या दर्शनासाठी भेट देतात. अशा पवित्र व जागृत देवस्थानात गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या आतील दरवाजाचे कुलूप तोडत प्रवेश केला व चांदीच्या दोन मूर्तींसह दानपेटी घेऊन पोबारा केला.

पहाटे पाचच्या सुमारास मंदिरातील पुजाऱ्यांना ही घटना आढळून आली. त्यांनी तत्काळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव बोरगुडे व विश्वस्त मंडळाला माहिती दिली. अध्यक्ष नामदेव बोरगुडेंनी निफाड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक गणेश गुरव व त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला.

यानंतर नाशिक येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने गाव परिसरातून धारणगाव रोडकडे दिशा दाखवली आणि तपासास गती मिळाली. दरम्यान नैताळे शेजारील गोविंदराव भवर यांच्या गट क्रमांक १६३ मधील विहिरीत रिकामी दानपेटी आढळून आली. मात्र चांदीच्या मूर्तींचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही.

घटनेची माहिती मिळताच निफाडचे आमदार दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, सागर पाटील कुंदे, निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, तलाठी शंकर खडांगळे तसेच ग्रामविकास अधिकारी उज्वला भोईर यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांशी चर्चा केली. लवकरात लवकर मूर्ती शोधून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वांनी केली आहे.

 : ग्रामस्थांचा शांततेचा निर्धार

नैताळेकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री मतोबा महाराजांच्या मूर्ती चोरीप्रकरणी ग्रामस्थांत तीव्र संताप असला तरी, कुठलीही अस्वस्थता न निर्माण करता ग्रामस्थांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. गावातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने १००% दुकाने बंद ठेवत घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून, पोलिसांनी तातडीने तपास करून मूर्ती परत मिळवावी, अशी सर्वांची मागणी आहे. — राजेंद्र बोरगुडे संचालक, ला.कृ.बा. समिती


No comments:

Post a Comment