धानाच्या गंजीला आग; शेतकऱ्याचे नुकसान



*कुही तालुक्यातील तारणा शेतशिवारातील घटना*


 जितेंद्र गोंडाणे कुही प्रतिनिधी

        कुही तालुक्यातील तारणा गावाच्या शेतशिवारात रचलेल्या धानाच्या गंजीला आग लागल्याची घटना घडली. यामध्ये ५० पोते धान असलेली धानाची गंजी जळून खाक झाली असून शेतकऱ्याला लाखोचा फटका बसला आहे. ही घटना मंगळवार, २ डिसेंबर रोजी रात्री घडली असून या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही आग लागली नसून कोणीतरी लावली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी शेतकऱ्याने उमरेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. संतोष फत्तुजी कुंबरे.असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून ते तालुक्यातील तारणा येथील रहिवासी आहेत.

दरम्यान, मागील दोन महिन्या अगोदर शेतकरी संतोष यांच्या शेतातील बैलांचा गोठा काही अज्ञात व्यक्तींनी पेटविला होता. संतोषकडे सहा एकर शेती असून त्यांनी दोन एकरात धान पिकाची लागवड केलेली होती. सध्या खरीप हंगामातील धान पिकाच्या कापणी, बांधणी आणि मळणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आधुनिक तंत्राचा उपयोग करून धान पिकाची कापणी करीत आहेत. पीडित अज्ञातांविरुद्ध उमरेड पोलिसांत तक्रार.

         शेतकऱ्याने मजुरांच्या हाताने मागील आठ दिवसा अगोदर धान कापणी करून शेतात गंजी लावली होती. धान काढण्याची मशीन उपलब्ध न झाल्याने शेतातील धानाची मळणी झाली नव्हती.

सदर शेतकरी मंगळवारला दुपारी दोन वाजता शेतात फेरफटका मारत असताना धानाची गंजी व्यवस्थित आढळली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी (बुधवार) ला अमृत वरेकर यांनी धानाची गंजी जळत असल्याची माहिती फोनद्वारे शेतकऱ्याला दिली. माहिती मिळताच लागलीच शेतात गेले असता धानाची गंजी पूर्णतः जळून खाक झालेली होती. कुणीतरी अज्ञात इसमाने शेतातील गंजीला आग लावल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यासंदर्भात उमरेड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून विकृत मानसिकतेतून प्रकार घडल्याचा संशय येत आहे.

        ऐन तोंडी आलेला घास हरविल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षीच्या अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त असताना यंदाच्या हंगामातील समाधानकारक धान पिकाची उचल हाती येत असताना, अज्ञात व्यक्तीकडून विकृत मानसिकतेतून घडलेल्या प्रकारामुळे कर्जाच्या खाईत ढकलल्या जात आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.

पुढील तपास उमेरड पोलिस करीता आहेत.


No comments:

Post a Comment