सामाजिक माध्यमांचा वापर जबाबदारपणे करावा - स.पो.नि भास्करराव शिंदे देवगाव विद्यालयात विद्यार्थ्यांना पोलिसांकडून आत्मसंरक्षण व स्पर्शज्ञानाचे धडे 

  



प्रतिनिधी :-   गणेश ठाकरे लासलगाव 

कायद्यामध्ये बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण, छळवणूक, छेडछाड, अश्लीलता, कुकर्म, अत्याचार, बलात्कार अपराधांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच अपराध्यास कठोर शासन करण्याकरिता

तरतूद केली आहे. संकटकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ डायल ११२ व १०९८ या आपत्कालीन सेवांचा वापर करावा, आपले शरीर हे महत्वाचा दागिना असून सोन्याच्या दागिन्याप्रमाणे शरीराची जपणूक करावी, महिला व मुलींनी सामाजिक माध्यमावर छायाचित्र टाकताना सावधगिरी व सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे. एकूणच सामाजिक माध्यमांचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी केले.

     देवगाव येथील श्री.डी.आर.भोसले विद्यालयात लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित 'विद्यार्थी सुरक्षा व स्वसंरक्षण'  जनजागृती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. भ्रमणध्वनीचा सुरक्षित वापर, चांगला - वाईट स्पर्श कसा ओळखावा, सायबर गुन्ह्यापासून संरक्षण, सामाजिक माध्यमांचा जबाबदारीने वापर, वाहतुकीचे नियम, शाळेत ये - जा करताना छळवणूक प्रतिक्रिया या सारख्या घटनांची आई - वडील व आपल्या शिक्षकांना तात्काळ माहिती देण्याची तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती शिंदे यांनी दिली.

      रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गवई यांनी मानवी तस्करी व उपाययोजना  तसेच पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील यांनी महिला व बाल सुरक्षा तसेच तांत्रिक जागरूकता याबाबत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नूतन विद्या प्रसारक मंडळ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महिला सुरक्षा कायदा व सुव्यवस्थेवर आधारित पथनाट्य सादर केले.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पं.स.समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे हे होते. तर व्यासपीठावर पो.पा.सुनील बोचरे, भास्कर बोचरे, मनोहर बोचरे, सुनंदा बोचरे, दिनेशकुमार शर्मा, प्राचार्य के.एम.गाजरे, पर्यवेक्षिका श्रीमती एस.ए. गांगुर्डे, एस.पी.गायकर आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment