दिवा शहरात "खान कंपाऊंड" सारख्या संकटाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता – तात्काळ कारवाईची मागणी



प्रतिनिधी अरविंद कोठारी

दिवा - दिवा प्रभाग समितीच्या हद्दीतील एव्हीके कंपाऊंड व खान कंपाउंड येथे १७ अनधिकृत बांधकामांवर नुकतीच कारवाई करण्यात आली असली तरी, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की दिवा शहरामध्ये भविष्यात यापेक्षा भयावह संकट गोरगरीब जनतेवर ओढवू शकते. सध्या दिवा शहरात मिळेल त्या जागेवर केवळ २ ते ३ महिन्यांत ७ ते ८ मजली अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या अवैध बांधकामांवर ठाणे महापालिका प्रशासनाचा कोणताही ठोस अंकुश नाही. त्यामुळे भविष्यात "खान कंपाऊंड" प्रमाणेच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम प्रकरण समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दररोज प्रभाग क्रमांक २७ व २८ मध्ये ३ ते ४ इमारतींचे स्लॅब भरले जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेल्या बांधकामांवर देखरेख ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे हे मात्र फक्त बघ्याची भूमिका बजावत आहेत. हे दुर्लक्ष केवळ निष्काळजीपणाचे लक्षण नसून, "पाणी कुठेतरी मुरतंय" असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. 

या पार्श्वभूमीवर, नागरिकांकडून ठाणे महानगरपालिका प्रशासनास मागणी केली आहेदिवा शहरातील प्रभाग २७ व २८ मधील सर्व बांधकामांवर तात्काळ सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी.निष्क्रीय आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी व कडक शिस्तभंगाची कारवाई केली जावी.सर्व बांधकामांवर रेकॉर्डिंग व फोटोद्वारे तांत्रिक विभागाची नियमित नोंदणी बंधनकारक करण्यात यावी.गोरगरीब जनतेच्या सुरक्षेसाठी व शहरशिस्त टिकवण्यासाठी महापालिकेने वेळेत पावले उचलली नाहीत, तर भविष्यातील गंभीर धोका प्रशासनावरच बोट दाखवणारा ठरेल.

No comments:

Post a Comment