पाचकंदील चौकात रस्त्यावरच वाहनतळ? नियमांना बगल
पोलिस-नगरपालिका प्रशासनाची बघ्याची भूमिका..!
पुणे जिल्हा प्रतिनिधी: अविनाश घोगरे
शिरूर शहराच्या मध्यवर्ती भागातील पाचकंदील चौक सध्या ‘अधिकृत बेकायदेशीर’ वाहनतळात रूपांतरित झाला आहे का, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. मुख्य बाजारपेठ, एचडीएफसी बँकेसमोरील रस्ता, गजबजलेल्या चौकात दुचाकी आणि चारचाकींच्या रांगा दिसतात, पण वाहतूक नियंत्रण करणारे पोलिस कारवाई करताना दिसत नाहीत.विशेष म्हणजे, एका स्थानिक व्यापाऱ्याने पार्किंगच्या जागेतच थेट गाळा उभारून त्याच ठिकाणी जिना टाकला असून ‘पार्किंगची सोय आहे’ असा बनाव केला आहे. परंतु हे बांधकाम परवानगीच्या अटींना हरताळ फासणारे असूनही, ना नगरपालिका प्रशासन दखल घेते ना पोलीस बेकायदेशीर वाहन पार्किंग करणा-यांवर कारवाई करतात.
अधिकाऱ्यांच्या आंधळेपणावर संशय...
या अतिक्रमणावर प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे ‘सगळं मुठीत घेणाऱ्या’ राजकीय आणि प्रशासकीय हितसंबंधांच्या कुजबुजीला उधाण आले असून, काही अधिकारी-कर्मचारी यामधून मलई खात असल्याचा आरोपही ऐकू येत आहेत.
वाहतूक कोंडीत व्यापारी-ग्राहक भरडले
शिरूरसह श्रीगोंदा, पारनेर आदी भागांमधून दररोज बाजारात येणाऱ्या हजारो ग्राहकांसाठी पार्किंग हा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा होत असून वादविवाद, धक्काबुक्कीच्या घटना देखील घडत आहेत.
प्रश्न अनुत्तरितच...
पोलिस प्रशासनाने अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई केली असताना पाचकंदील परिसरातील बेकायदेशीर पार्किंगवर मात्र कारवाईचा शून्य टक्का! काय पोलीस आणि नगरपालिका प्रशासन मुद्दाम दुर्लक्ष करत आहेत का? नक्की पाणी कुठे मुरतंय?
नागरिकांचा संताप उफाळला
या अराजकतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. "सामान्य माणसाने नियम तोडला तर दंड, पण बड्यांनी बेकायदेशीर बांधकाम केले तरी कोणी काहीच करत नाही. हा न्याय आहे का?" असा सवाल करत अनेक नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
शहराच्या शिस्तीला फाटाच.!
पाचकंदील चौकातील ही स्थिती केवळ वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न नाही, तर शिरूर शहराच्या कायदेकानून आणि सार्वजनिक व्यवस्थेच्या अधोगतीचं जिवंत उदाहरण ठरत आहे. आता या समस्येकडे प्रशासन नेमकी कधी आणि कशी दखल घेणार, हाच खरा प्रश्न आहे.
No comments:
Post a Comment