"शिरूर शहरात पार्किंगचा विस्फोट..!


 

अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष संभाजीराजे कर्डिले यांचा प्रशासनाला खडा सवाल – “व्यवस्था नसेल तर दंड का..?”


पुणे जिल्हा प्रतिनिधी – अविनाश घोगरे


शिरूर शहरातील पार्किंग समस्या आता जनतेच्या त्रासाच्या पातळीवरून थेट आंदोलनाच्या उंबरठ्यावर आली आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आणि बेफिकीर प्रशासनामुळे सामान्य नागरिकांना दिवसभर त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष संभाजीराजे कर्डिले यांनी थेट प्रशासनावर हल्लाबोल करत ठामपणे सांगितले – "शहरात पार्किंगची एकही सोय नाही, पण पोलिस दंडाचा धडाका मात्र सुरू आहे!"


 पार्किंग नाही पण दंड मात्र जोमात – नागरिक त्रस्त

शिरूर हे श्रीगोंदा, पारनेर आणि शिरूर अशा तीन तालुक्यांच्या मध्यभागी असलेलं एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र आहे. दररोज हजारो शेतकरी, कामगार आणि ग्राहक शहरात येतात, पण वाहन पार्किंगसाठी कोणतीही सुसज्ज सोय नाही. कर्डिले म्हणाले, "पंचक्रोशीतील लोकांना वाहनं बायपासवर लावून दुचाकीने शहरात यावं लागतं. रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली, की पोलिस फोटो काढून दंड पाठवतात!"

“पार्किंगची कोणतीच व्यवस्था नसताना नागरिकांना दोषी ठरवणे हे अन्यायकारक आहे,”असा ठणकावलेला सवाल त्यांनी केला.

फलक नसताना नो पार्किंगचा काय अर्थ?

पुणे, अहमदनगर सारख्या मोठ्या शहरांमध्ये स्पष्ट ‘नो पार्किंग’ आणि ‘पार्किंग’चे फलक असतात. मात्र शिरूरमध्ये असे कोणतेही बोर्ड दिसत नाहीत.

"गावाकडून आलेल्या एखाद्या माणसाने कुठे गाडी लावायची, हे ओळखायचं तरी कसं?" असा व्यावहारिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अतिक्रमणाचं साम्राज्य, प्रशासनाच्या डोळ्यांसमोर वाढतंयपार्किंगच्या जागा अतिक्रमणाने व्यापलेल्या आहेत. दुकानांचे सामान, हातगाड्या आणि खासगी अडथळे यामुळे रस्ते अरुंद झाले असून, पोलिस किंवा नगरपरिषद याकडे लक्ष देत नाही, हे कर्डिले यांनी मुद्दाम अधोरेखित केले. "अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई नाही, पण सामान्य माणसावर दंडाचा बडगा – ही शिरूरची दुर्दैवाची स्थिती आहे!" असं त्यांनी संतप्तपणे सांगितलं.

महसूल, पोलीस आणि नगरपरिषद यांची संयुक्त बैठक घेऊन ठोस उपाययोजना करा

कर्डिले यांनी प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला आहे – "जर पार्किंग व्यवस्था लवकरात लवकर करण्यात आली नाही, तर नागरिक आणि संघटना रस्त्यावर उतरतील!"शहरातील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी व विविध संघटनांनी या मुद्द्यावर एकत्र येऊन आंदोलन छेडावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

 शहरासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत वाहतूक आराखडा हवाशहरात वाहतुकीचं योग्य नियोजन, मल्टिस्टोरी पार्किंग, अतिक्रमणमुक्त रस्ते आणि स्पष्ट साईनबोर्ड्स ही वेळेची गरज आहे.अखिल भारतीय मराठा महासंघासारख्या संघटनांनी आवाज उठवल्यानंतर आता प्रशासनाने जागं होऊन प्रत्यक्षात कृती करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.

शिरूर शहरातील पार्किंग समस्या ही केवळ वाहतुकीची नव्हे, तर नियोजनशून्य आणि उदासीन प्रशासनाची गंभीर लक्षणं आहेत. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जाऊ नये. प्रशासन, पोलीस आणि नगरपरिषद यांनी एकत्रित येऊन तातडीने आणि दृढ इच्छाशक्तीने या समस्येवर कायमचा तोडगा काढावा, हीच नागरिकांची आजची स्पष्ट मागणी आहे.


No comments:

Post a Comment