शिरूरमध्ये मोटारसायकल चोरटा अखेर जेरबंद.! शिताफीने परजिल्ह्यातून पकड – पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी..




पुणे जिल्हा | प्रतिनिधी:- अविनाश घोगरे 


शिरूर शहरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल प्रकरणात शिरूर पोलिसांनी एका सराईत चोरट्यास परजिल्ह्यातून शिताफीने अटक केली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकलही हस्तगत करण्यात यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

घटना कशी घडली? दिनांक २८ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत मार्केटयार्ड शिरूर येथील मोकळ्या जागेत फिर्यादीने होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल (क्र. MH-13-BG-6927) हँडल लॉक करून उभी केली होती. अज्ञात इसमाने हँडल लॉक तोडून ती चोरी केली. फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा (क्र. ३६६/२०२५) दाखल करण्यात आला.

तपासाचा पुढचा टप्पा – पोलिसांची कसून मेहनत शिरूर शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी तपासासाठी खास पथक नियुक्त केले. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ आदींनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान आरोपी बापू गजानन थोरात (वय ३५, रा. बोळेगाव, ता. अहिल्यानगर) याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याचा नागपूर एमआयडीसी (अहिल्यानगर) परिसरात शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

आरोपीची पार्श्वभूमी – पुणे जिल्ह्यातील 'सीरियल' चोर आरोपी बापू थोरात हा सराईत गुन्हेगार असून, पुणे ग्रामीण, पुणे शहर, अहिल्यानगर, पिंपरी चिंचवड अशा विविध ठिकाणी मोटारसायकल चोरीचे ९ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. पोलिसांकडून त्याच्या इतर गुन्ह्यांचा तपासही सुरू आहे.पोलीस पथकाचा सन्मान ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार शिवाजी खेडकर (सध्या पुढील तपासाधिकारी), नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रवि काळे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांच्या अथक प्रयत्नातून पार पडली.


शहरातील नागरिकांनी शिरूर पोलिसांच्या या जलद आणि परिणामकारक कारवाईचे अभिनंदन केले आहे. चोरी रोखण्यासाठी पोलिसांची ही सक्रियता उल्लेखनीय ठरत असून, नागरिकांनीही सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment