चहा घोटता घोटता यशाचे घोटही...! हातात चहाची किटली, डोक्यात यशाचे स्वप्न – अशोक लांडे याची ९५.४०% ची यशोगाथा..!
शिरूर – सकाळपासून शाळा, शाळेनंतर चहाच्या गाडीवर काम आणि रात्री पुन्हा अभ्यास... हे वेळापत्रक केवळ ऐकायलाच कठीण वाटेल; पण शिरूरमधील अशोक गजानन लांडे याने हे काटेकोरपणे पाळत दहावीच्या परीक्षेत थक्क करणारे ९५.४० टक्के गुण मिळवत सर्वांनाच प्रेरणा दिली आहे. हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या कुटुंबाला त्याने आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण दिला आहे.
येथील विद्याधाम प्रशालेत शिकणाऱ्या अशोक चे हे यश केवळ गुणांचे नसून जिद्द, मेहनत, त्याग आणि आत्मविश्वासाचे फलित आहे. त्याचे वडील गजानन लांडे यांची जिल्हा बँकेसमोर चहाची हातगाडी असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आई उषा गृहिणी असून त्या देखील या व्यवसायात सक्रीय मदत करतात. अशोकचा मोठा भाऊ दीपक सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. घरातील दोन मुलांचे शिक्षण सांभाळताना आर्थिक ओढाताण तर होतीच, पण कधीच शिक्षणावर खर्च कमी करण्यात आला नाही. पोटाला चिमटा घेऊनही त्यांनी मुलांना शिकवले.
अशोकचा दिवस असा सुरू व्हायचा – भल्या पहाटे उठून अभ्यास, त्यानंतर चहाच्या गाडीवर वडिलांना मदत, मग शाळा, शाळेनंतर पुन्हा चहाची गाडी आणि रात्री उशिरा अभ्यास. कपबश्या विसळणे, टेबल पुसणे, चहा बनविणे, ग्राहकांना चहा पोहचविणे ही कामे करताना त्याने अभ्यासाची दोरी कधीही सोडली नाही.
या यशाची दुसरी बाजू आणखी हृदयस्पर्शी आहे. दहावीच्या परीक्षेच्या तोंडावरच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बायपास सर्जरी झाली. खर्चाचा डोंगर उभा राहिला आणि काही काळ हातगाडी बंद राहिली. या संकटातही अशोक आणि दीपक यांनी गाडी पुन्हा सुरू केली, उपचार चालू ठेवले आणि अभ्यासाकडेही लक्ष दिले. काळाच्या कसोटीवर न डगमगता अशोकने ठाम निर्धार केला – "हे यश आपलं असणारच..!"
आई-वडीलांचे संस्कार आणि त्याग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःचा प्रचंड आत्मविश्वास या आधारांवर अशोकने हे स्वप्न सत्यात उतरवले. विद्याधाम स्कूलमधील शिक्षकांनीही त्याच्या घरच्या परिस्थितीची जाण ठेवत वेळोवेळी मार्गदर्शन, शंका निरसन आणि मानसिक आधार दिला.
आज अशोकचा आत्मविश्वास बळावला आहे. तो शास्त्र शाखेत प्रवेश घेऊन सीईटीच्या माध्यमातून इंजिनिअरिंग क्षेत्रात जाण्याचे स्वप्न पाहत आहे. त्याची ही वाटचाल अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वाटावी अशीच आहे. अशोक लांडे – केवळ चहा नव्हे, यशही उकळणारा एक संघर्षमय तरुण..!
No comments:
Post a Comment