शिरूर नगरपरिषदेसमोरील १७ एकर शासकीय जागेच्या हस्तांतरणासाठी महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक : आ. माऊली कटके यांच्या प्रयत्नांना यश..



शिरूर नगरपरिषदेच्या समोरील सुमारे १७ एकर शासकीय जागा पुन्हा नगरपरिषदेला मिळावी यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण बैठक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबई मंत्रालयात पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन जागा नगरपरिषदेच्या ताब्यात देण्याच्या दिशेने प्रक्रियेची नोंद घेण्यात आली.

पूर्वी नगरपरिषदेकडे असलेली ही जागा काही कारणांमुळे शासनाकडे जमा झाली होती. मात्र, शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी सातत्याने पाठपुरावा करून ही जागा पुन्हा शिरूर नगरपरिषदेकडे मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या प्रयत्नांना आता सकारात्मक वळण मिळाले आहे.

बैठकीस पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील तसेच विविध संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत केवळ जमिनीच्या हस्तांतरणाचीच नव्हे, तर घोडनदी व शिरूर शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भातही सखोल चर्चा झाली.

नगरपरिषदेच्या ताब्यात ही १७ एकर जागा आली, तर तिचा उपयोग तालुका क्रीडा संकुल, अत्याधुनिक नाट्यगृह, सार्वजनिक उद्याने, शैक्षणिक संस्था, नागरी सुविधा व इतर विविध विकासकामांसाठी करण्यात येऊ शकतो. त्यामुळे शिरूरच्या नियोजित, शाश्वत आणि लोकाभिमुख विकासाच्या दृष्टीने ही बैठक एक महत्त्वपूर्ण वाटचाल ठरली आहे.

या पुढाकारामुळे शिरूर व घोडनदी शहराच्या भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन, शाश्वत विकासाचे नवीन दालन खुले होण्याची शक्यता निर्माण झाली असून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment