एकट्यानेच केल्या १२ घरफोड्या; सीसीटीव्ही फुटेजमुळे फुटले बिंग

 

               पोलिसांनी आरोपीस पकडले : २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : शहरातील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने हेरून पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ३५ तोळे सोने, ५०० ग्रॅम चांदी असा २५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी केली.

पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांत घरफोड्या वाढल्या होत्या. चोरीस गेलेला ऐवज मोठ्या रकमेचा असल्याने तपासाचे आव्हान होते. भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड व त्यांच्या पथकाने शहरातील गांधीनगर, मोर चौक,छत्रपती चौक, बजाज नगर, एकता नगर आणि विविध भागातील सुमारे अडीचशे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला शोधून काढले. २३ डिसेंबर रोजी पथकातील अधिकारी, कर्मचारी गस्त घालत असताना जिरायत मैदान परिसरात हा आरोपी संशयितरित्या फिरत होता.

पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला. गुन्हे पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अभिजीत उर्फ अभय देवराव राऊत असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने एकट्यानेच १२ घरफोड्या केल्या होत्या. त्या सर्व उघड झाल्या आहेत. या गुन्ह्यातील ३५ तोळे सोने, ५०० ग्रॅम चांदी, लॅपटॉप, टीव्ही, मोबाइल, कॅमेरा असा २५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड व त्यांच्या पथकाने केलेल्या कामगिरीचे कोकाटे यांनी कौतुक केले या पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी किरीतिका सी. एम., उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय आदींची उपस्थिती होती


No comments:

Post a Comment