२९ गुन्हे दाखल असलेला सोनसाखळी चोरटा पकडला
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: चांदणी चौकातून ठोकल्या बेड्या
अहमदनगर : जिल्ह्यातील शिर्डी, श्रीरामपूर, लोणी राहुरी, संगमनेर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल सोनसाखळी चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने पाठलाग करत मुसक्या आवळल्या. आरोपीकडून चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफाला आरोपी करण्यात आले आहे.
अटक केलेल्या आरोपीविरोधात विविध पोलिस ठाण्यात चोरीचे २९ गुन्हे दाखल आहेत. सचिन लक्ष्मण ताके (वय ३३, रा. उंदिरगाव, ता. श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २० नोव्हेंबर रोजी संगमनेर शहरातील उषा अशोक लोंगानी नातवाला घेऊन घराकडे जात होत्या. त्यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ओरबाडले होते. याबाबत लोंगानी यांनी ३ दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतला. तांत्रिक विश्लेषणात ताके याचे नाव समोर आले. तो व त्याचा साथीदार लाल रंगाच्या विना क्रमांकाच्या मोटारसायकलवरून श्रीगोंदामार्गे नगरकडे येत आहे, अशी खबर मिळाली. पोलिसांनी तत्काळ चांदणी चौकात सापळा रचला. तेव्हा दोघेजण लाल रंगाच्या दुचाकीवरून येताना पोलिसांना दिसले. त्यांचा पाठलाग केला असता मागे बसलेल्या ताके याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. मात्र, त्याचा साथीदार पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी झाला.
अटक केलेल्या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने संगमनेर येथील सोनसाखळी चोरीची कबुली दिली. चोरीचे दागिने विजय पोपट उदावंत (रा. रुईछत्तीसी, ता. राहाता) याला विकल्याचे सांगितले. त्यालाही या घटनेत आरोपी करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील मनोहर गोसावी, संतोष लोंढे, रवींद्र कर्डिले, संदीप चव्हाण, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, रणजित जाधव आदींच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment