आंदोलनकर्त्यांवर काळाचा घाला; दोघे ठार, तिघे गंभीर

  

    धनगर आरक्षणासाठी नागपूरला निघालेल्या मोर्चात होते सहभागी

माहूर : धनगर आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या परभणी येथील आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला अंजनखेडजवळ भीषण अपघात होऊन दोघे जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. १२ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रमेश दत्तराव वाघमारे (५०) आणि लक्ष्मण पंडित वाघमारे (३५, दोघे रा. सरफाराजपूर, ता. पालम, जि. परभणी) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. तर चालक रंगनाथ संपतराव वाघमारे, रामजी बालाजी बनसोडे आणि बापूराव मारोती वाघमारे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविले आहे. माहूर तालुक्यातील वाई बाजारपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावर अंजनखेड हे गाव आहे. अंजनखेडजवळील पुलावर सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार सरफराजपूर (ता. पालम) येथील चालकासह पाच जण धनगर आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी नागपूर येथे गेले होते. तेथून परतीच्या मार्गावर असताना वाटेत चंद्रपूर येथे देवदर्शन घेऊन परत जात होते. त्यावेळी हा भीषण अपघात घडल्याचे जखमींकडून सांगण्यात आले.

या भीषण धडकेत चारचाकी गाडीच्या समोरील बाजूचा अक्षरशः चुराडा झाला. गाडीतील रमेश दत्तराव वाघमारे (५०) व लक्ष्मण पंडित वाघमारे (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक रंगनाथ संपथराव वाघमारे, रामजी बालाजी बनसोड व बापूराव मारोती वाघमारे यांना गंभीर अवस्थेत माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

                                कारची अवजड वाहनाला धडक

■ १२ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास कारने (एमएच ०२/ बीपी ९८३६) पुढे जाणाऱ्या अवजड वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली.

■ घटनेची माहिती मिळताच सिंदखेड ठाण्याचे उपनिरीक्षक एस.पी. नागरगोजे यांच्यासह कर्मचारी दारासिंग चौहान यांनी घटनास्थळचा पंचनामा केला.

                                अपघातांची मालिका सुरुच

        नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनावर यंदा शंभरहून अधिक मोर्चे धडकणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या संघटना तसेच समाजाचे कार्यकर्ते हे नागपूरला दाखल झाले होते.अधिवेशनावर काढलेल्या मोर्चानंतर परत येताना मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहने दिसून येत आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.


No comments:

Post a Comment