जाफराबाद तालुक्यातील 55 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या हालचालींना वेग
दर्पण प्रतिनिधी / जाफ्राबाद
तालुक्यातील 55 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने गाव पातळीवर गटागटात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. विशेष म्हणजे सरपंचाची निवड ही थेट जनतेतून होणार असल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जवळ आला आहे. सरपंच आणि सदस्य पदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात याची चाचपणी करण्यात सुरुवात झाली आहे.
ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या नेतृत्वात लढविल्या जात आहेत. त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. सरपंच पदाचा उमेदवार तगडा देण्याच्या हालचाली ही सुरू आहेत निवडणुका जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण तापले असून चावडीवर आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
No comments:
Post a Comment