क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा, देऊळगाव राजा येथे आषाढी एकादशी निमित्त 'बालदिंडी व शिक्षणाची वारी' उत्साहात संपन्न
अनिकेत भाग्यवंतजिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
देऊळगाव राजा : दि २८ जुलै २०२६
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने दिनांक 24 जुलै रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा, देऊळगाव राजा येथे 'बालदिंडी व शिक्षणाची वारी' हा अभिनव उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत वारकरी, टाळकरी, फुगडीकरी, पताकाधारी तसेच विविध संतांच्या वेशभूषा साकारून आषाढी वारीचे जिवंत चित्र उभे केले. फुलांनी आकर्षक सजविलेल्या पालखीत श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमांसह क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमा, भारतीय संविधान आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ विराजमान करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग आणि नामस्मरण करत परिसरात दिंडी काढली. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
या 'शिक्षणाची वारी'मधून विद्यार्थ्यांनी "झाडे लावा, झाडे जगवा", "पर्यावरणाचे रक्षण करा", "स्वच्छता राखा", "शिक्षण हाच खरा धर्म" अशा सामाजिक व शैक्षणिक संदेशांचा प्रभावी प्रसार केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी, संस्कार आणि वारकरी परंपरेबद्दल आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक बंधू-भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम अधिक रंगतदार व संस्मरणीय ठरला.

No comments:
Post a Comment