तापोळा–महाबळेश्वर मार्ग सुरू; १०५ गावांना दिलासा



अतिवृष्टीने खचलेल्या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती; जनप्रतिनिधी, प्रशासन व ग्रामस्थांची एकजूट

प्रतिनिधि - सुरेंद्र जाधव 

महाबळेश्वर : अतिवृष्टीमुळे खचलेल्या तापोळा–महाबळेश्वर मुख्य मार्गाची युद्धपातळीवर दुरुस्ती करून अखेर छोट्या चारचाकी वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली. १०५ गावांची जीवनवाहिनी असलेल्या या मार्गामुळे हजारो ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रस्ता खचल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य अजितदादा सकपाळ आणि महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संजयभाई मोरे यांनी शासकीय निधीची प्रतीक्षा न करता स्वखर्चातून मदत उपलब्ध करून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. नगरसेवक आबा शिंदे यांनी अवजड यंत्रसामग्रीचे नियोजन करून प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहत कामाचा पाठपुरावा केला.

रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी विशालभाऊ सकपाळ, उत्तम भालेराव, भाऊसाहेब मोरे, संपत जाधव, गणेश सपकाळ, राम सपकाळ, राजू सपकाळ, आनंददादा (खांबील) यांच्यासह १०५ गाव नियोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तहसील प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद, वन विभाग आणि इतर यंत्रणांनीही रात्रंदिवस प्रयत्न केले.

दरम्यान, रस्त्यालगतच्या खाजगी मालमत्ताधारकाने स्वतःच्या मालमत्तेचे नुकसान होत असतानाही सार्वजनिक हितासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे.

‘लोककारण’ ठरले प्रभावी

आपत्तीच्या काळात राजकीय मतभेद बाजूला ठेवून जनप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट या कामाचे वैशिष्ट्य ठरले. सामूहिक प्रयत्नांतून १०५ गावांचा संपर्क पूर्ववत करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या सर्वांच्या योगदानाबद्दल ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment