'स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन; रामदास कदम यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
(वैभव कळस )
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, म्हसळा तालुक्याच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला तसेच उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हसळा तालुकाध्यक्ष समीर बनकर म्हणाले, "महायुतीमध्ये सहभागी राहून महायुतीतील प्रमुख नेत्यांवर अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरणे ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. भविष्यात अशा प्रकारचे खालच्या दर्जाचे वक्तव्य किंवा अपशब्द पुन्हा वापरण्यात आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला जशास तसे उत्तर देईल."
या वेळी पंचायत समिती सभापती बबन मनवे, उपसभापती लव (लहु) म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, म्हसळा नगराध्यक्ष सुनील शेडगे, पंचायत समिती सदस्या प्रियांका निमरे, समृद्धी चाचले, अभिषेक विचारे, संजय कर्णिक, अनिकेत पानसरे, महेश घोले, किरण पलांडे, वृषाली घोसाळकर, मीना टिंगरे, सरोज मंगेश म्हशीलकर, सतीश शिगवण, प्रकाश गाणेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत, महायुतीतील नेत्यांविषयी अपमानास्पद भाषा वापरणे टाळावे, अशी मागणी केली. तसेच राजकीय मतभेद असले तरी सभ्य भाषेचा वापर करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

No comments:
Post a Comment