सोनम वांगचूक प्रकरणाचा निषेध; विद्यार्थ्यांचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा, केंद्र सरकारला निवेदन.



 प्रतिनिधी गजानन चव्हाण 

लडाखमधील पर्यावरणवादी व प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्याशी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ मूर्तिजापूर शहरातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी (एसडीएम) कार्यालयावर शांततापूर्ण मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी एसडीएम यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवेदनात विद्यार्थ्यांनी नमूद केले की, पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि लोकशाही मूल्यांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सोनम वांगचूक यांच्याशी झालेली कथित गैरवर्तणूक अत्यंत निषेधार्ह असून, त्यामुळे देशभरातील विद्यार्थीवर्गात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांशी सन्मानपूर्वक वागणूक दिली जावी आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण व्हावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

यासोबतच, नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणीही निवेदनातून करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणांमध्ये कोणतीही तडजोड न करता न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते भगतसिहं चौक ते आठवडा बाजार या मार्गाने संपूर्ण आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडले. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक तसेच सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेत संबंधित प्रकरणांवर तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.


No comments:

Post a Comment