भ्रष्टाचाराची तक्रार केल्याचा सूड; माजी सैनिकाला घर पाडण्याची धमकी
श्रीगोंदा (वार्ताहर): चिखली (ता. श्रीगोंदा) येथील माजी सैनिक महेश भिवसेन झेंडे यांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून घराचे पाडकाम करण्याची धमकी देण्यात आली आहे. झेंडे यांनी ग्रामपंचायतीतील विविध भ्रष्टाचाराचे अर्ज केल्यामुळे, हे घर पाडण्याचे कारस्थान रचले गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
झेंडे यांनी रोजगार हमी योजना, मुरूम चोरी आणि वाचनालय गैरव्यवहाराबाबत तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी मागे घेण्यासाठी ग्रामसेवक तानाजी पानसरे आणि सरपंच कुलदीप कदम हे दबाव टाकत आहेत. झेंडे यांचे अतिक्रमण प्रकरण विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असतानाही, प्रशासनाने १६ आणि १७ जुलै रोजी ही कारवाई करण्याचे नियोजन केले आहे.
माजी सैनिकाने याप्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे धाव घेतली असून, प्रशासनाने या सूडबुद्धीच्या कारवाईला तात्काळ स्थगिती देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

No comments:
Post a Comment