'वर्ल्ड कप वूडबॉल स्पर्धेसाठी डॉ. हेमंत पयेर यांची पंच म्हणून निवड'

 


(वैभव कळस )

मलेशियातील पर्लीस येथे २४ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या १० व्या वर्ल्ड कप वूडबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी डॉ. हेमंत पयेर यांची अधिकृत पंच (Referee) म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे रायगड जिल्ह्यासह भारतीय वूडबॉल क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

डॉ. हेमंत पयेर हे वूडबॉल या खेळातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू असून त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी २०२४ मध्ये चीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पंच पात्रता परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पंच म्हणूनही आपली गुणवत्ता सिद्ध केली.

सध्या ते भारतीय वूडबॉल संघटनेच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. वर्ल्ड कपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अधिकृत पंच म्हणून झालेली त्यांची निवड ही भारतीय वूडबॉलच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची साक्ष असल्याचे मानले जात आहे.

या यशामागे भारतीय वूडबॉल संघटनेचे अध्यक्ष आशिष देशमुख, उपाध्यक्ष किशोर बागडे, महासचिव अजय सोनटक्के, खजिनदार डॉ. प्रविण मानवटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. सुदीप मानवटकर तसेच सहसचिव देवांग शहा आणि सागर सावंत यांचे मार्गदर्शन लाभल्याची भावना डॉ. हेमंत पयेर यांनी व्यक्त केली.

डॉ. हेमंत पयेर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रायगड जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, विविध क्षेत्रातील मान्यवर, वूडबॉल खेळाडू आणि क्रीडा संघटनांनी त्यांचे अभिनंदन करत वर्ल्ड कप स्पर्धेतील यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

No comments:

Post a Comment