पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न


दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'अँग्रो एक्सपोर्ट हब उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय-–
पालकमंत्री गणेश नाईक


दर्पण प्रतिनिधी संतोष ठाकरे

​​पालघर दि १७ जुलै २०२६ : पालघर जिल्ह्याचा आरोग्‍य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून समन्याय व सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व यंत्रणांनी कटिबद्ध राहावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री  गणेश नाईक यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली 'जिल्हा नियोजन समितीची' (DPDC) महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

​या बैठकीस खासदार डॉ. हेमंत सवरा, आ. ॲड. निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. रवींद्र फाटक, आ. राजेंद्र गावित, आ. शांताराम मोरे, आ. विलास तरे, आ. विनोद निकोले, आ. हरिश्चंद्र भोये, आ.  स्नेहा दुबे पंडित, आ. राजन नाईक, तसेच जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, वसई-विरार मनपाचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

​   ​दापचरी येथे आंतरराष्ट्रीय Agro Export Hub:

डहाणू तालुक्यातील दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'Agro Export Hub' (International Agricultural Market / Terminal Market) उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हे हब राज्यातील शेतीमाल निर्यातीचे मोठे लॉजिस्टिक केंद्र ठरेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात पालघरमधील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची सुवर्णसंधी मिळण्यासाठी ठोस धोरण ठरविण्याचा ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

​सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी आदिवासी घटक कार्यक्रम, सर्वसाधारण व विशेष घटक योजनेअंतर्गत एकूण रु. ८५९.३८ कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यातील लोकसंख्या, स्थानिक समस्या आणि कामाची गरज लक्षात घेऊन समन्याय पद्धतीने हा निधी वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच मागील वर्षाचा (२०२५-२६) उर्वरित निधी मार्च २०२७ पूर्वी १००% खर्च करण्याचे स्पष्ट आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी सर्व विभागांना दिले.


जिल्ह्यातील उर्वरित सर्व महसुली गावे, वाड्या आणि पाड्यांवर या आर्थिक वर्षात प्राधान्याने स्मशानभूमी बांधण्यात येतील. 'विकसित महाराष्ट्र २०३०' आणि जिल्हा विकास आराखड्यानुसार आरोग्य, क्रीडा, पर्यटन, ऊर्जा आणि आदिवासी क्षेत्रातील रस्ते नसलेली गावे जोडण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

​स्मारके आणि श्रीराम मंदिराला 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा:

पालघर येथे आद्यक्रांतीकारक भगवान बिरसा मुंडा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जागा निश्चित करण्यात आली असून, याचा सविस्तर आराखडा लवकरच शासनाला सादर केला जाईल. याशिवाय, पालघर शहरातील ऐतिहासिक श्रीराम मंदिरास सर्वानुमते “क” वर्ग तीर्थक्षेत्र/यात्रास्थळाचा दर्जा प्रदान करण्यात आला असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले 


 विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजन व वाटप

​बैठकीदरम्यान पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जव्हार तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा विनवळ येथील बहुउद्देशीय सभागृहाचे आभासी (व्हर्च्युअल) भूमिपूजन करण्यात आले.

​या प्रसंगी पेसा (PESA) क्षेत्रातील २६ पात्र उमेदवारांना 'शिक्षणसेवक' पदाचे नियुक्ती आदेश, राष्ट्रीय बांबू अभियान व अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३१ बांबू उत्पादक शेतकऱ्यांना बांबू रोपे व अनुदान मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच 'बांबूपासून समृद्धीकडे' या विशेष पुस्तकाचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment