नाईक–अंतुले महाविद्यालयात ‘पदवी काळात स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी?’ मार्गदर्शन कार्यशाळा व पुस्तक प्रदर्शन

 


(वैभव कळस)

 कोकण उन्नती मित्र मंडळ, मुंबई संचलित तथा बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेब यांनी स्थापन केलेल्या वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय, म्हसळा येथे स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने ‘पदवी काळात स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी?’ या विषयावरील मार्गदर्शन कार्यशाळा व स्पर्धा परीक्षा विषयक पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

कोकण उन्नती मित्र मंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले व महाविद्यालय विकास समिती यांच्या मार्गदर्शनाखाली, वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, रोहा आणि युनिक अकॅडमी, पुणे संचलित सुनिल तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. दिगंबर टेकळे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून युनिक अकॅडमीचे मुख्य व्यवस्थापक (प्रशासन व पब्लिकेशन) प्रा. नागेश गव्हाणे उपस्थित होते. तसेच शाहानवाझ उकये यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रास्ताविकात प्रभारी प्राचार्य प्रा. दिगंबर टेकळे यांनी खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे हे कोकणातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सनदी अधिकारी व्हावेत यासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्पर्धा परीक्षांचे वाढते महत्त्व, योग्य नियोजनाची आवश्यकता तसेच एमपीएससी व यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा त्यांनी उल्लेख केला.

प्रमुख मार्गदर्शक प्रा. नागेश गव्हाणे यांनी महाविद्यालयीन शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचा परस्परसंबंध स्पष्ट करताना पदवी अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षांसाठी कसा पूरक ठरतो, याचे सविस्तर विवेचन केले. 

त्यांनी पारंपरिक परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा यांतील फरक स्पष्ट करून एमपीएससी व यूपीएससी परीक्षांची रचना, अभ्यासक्रम, तयारीची दिशा, वेळेचे नियोजन, रोजगाराच्या संधी तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विविध विद्यार्थ्यांची उदाहरणे देत उपस्थितांना प्रेरित केले. इतर राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षांना दिले जाणारे महत्त्व, पालकांचे योगदान आणि सनदी अधिकाऱ्यांची समाजातील भूमिका यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.

कोकणातील युवक शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याने पोलीस, लष्कर व इतर मैदानी स्पर्धांमध्ये ते निश्चित यश मिळवू शकतात, मात्र त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेच्या निमित्ताने युनिक अकॅडमीच्या प्रकाशन विभागातर्फे स्पर्धा परीक्षा विषयक पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात आयएएस अधिकारी अन्सार शेख लिखित ‘यूपीएससी : मी आणि तुम्ही’, विष्णू औटी लिखित ‘नाना, मी साहेब झालो’ यांसह चालू घडामोडी, प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास, अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था व सामाजिक विकास, नीतिशास्त्र, सचोटी व नैसर्गिक क्षमता, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, सामान्य विज्ञान, यूपीएससी, एमपीएससी तसेच पोलीस भरतीसाठी उपयुक्त अशी विविध पुस्तके विद्यार्थ्यांना विशेष सवलतीत उपलब्ध करून देण्यात आली.


कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका कु. कांचन पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. राजेंद्र हालोर यांनी केले. 


कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मयुर बढे, प्राध्या.सलमा नजिरी,अतिका नजिरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment