दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांसाठी खासदार भास्करराव भगरे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी भेट
प्रतिनिधी : गणेश ठाकरे, लासलगाव नाशिक
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे सर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित व अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी विविध मागण्यांसंदर्भातील अधिकृत निवेदने रेल्वेमंत्र्यांना सुपूर्द करून त्यावर तातडीने आवश्यक निर्णय घेण्याची मागणी केली.
कोविड काळापासून बंद असलेल्या रेल्वे सेवा पुन्हा सुरू करणे, लासलगावसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर बंद करण्यात आलेले रेल्वे थांबे पूर्ववत करणे, तसेच विविध रेल्वे अंडरपासमध्ये साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत खासदार भगरे यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
गोदावरी एक्सप्रेस तसेच मनमाड–इगतपुरी शटल सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त बोग्या जोडण्यात याव्यात.
देवगिरी, शालीमार, जनता एक्सप्रेस व मुंबई–हावडा मेल या गाड्यांचे लासलगाव येथील बंद केलेले थांबे पूर्ववत सुरू करण्यात यावेत.
निफाड–कुंदेवाडी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी, पादचारी पुलाची उभारणी करावी, प्रवासी सुविधांचा विकास करावा तसेच सदर स्थानकाचा ‘अमृत भारत स्टेशन योजने’त समावेश करावा.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विविध रेल्वे अंडरपासमध्ये साचणाऱ्या पाण्याच्या समस्येची पाहणी करून आवश्यक त्या कायमस्वरूपी सुधारात्मक उपाययोजना करण्यात याव्यात.
मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि सुविधाजनक व्हावा, यासाठी खासदार भास्करराव भगरे सर सातत्याने रेल्वे प्रश्नांचा पाठपुरावा करीत आहेत. या मागण्यांवर रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक व तातडीने कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

No comments:
Post a Comment