कावड पालखी उत्सवासाठी अकोला पोलिसांची जय्यत तयारी



प्रतिनिधी गजानन चव्हाण 

 कावड उत्सव २०२६ शांततेत, शिस्तीत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी अकोला पोलिसांच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली कावड उत्सव समन्वय बैठक घेण्यात आली.या बैठकीला अकोला शहर तसेच ग्रामीण भागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, कावड पालखी व शिवभक्त मंडळांचे पदाधिकारी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील यांनी कावड उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागामार्फत करण्यात येणाऱ्या बंदोबस्तासह सुरक्षाविषयक उपाययोजनांची माहिती दिली. तसेच एपीआय ढोले यांनी गांधिग्राम येथील कावड उत्सवाच्या अनुषंगाने परिस्थिती व पोलीस विभागाच्या नियोजनाची माहिती उपस्थितांना दिली,

कावड उत्सव शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी वाहतूक व्यवस्था, मिरवणुकीदरम्यान येणाऱ्या अडचणी तसेच विविध समस्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. कावड उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली.विशेष म्हणजे, कावड पालखीच्या पदाधिकाऱ्यांनी नशामुक्त कावड उत्सव राबविण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेतला असून, त्याचे पोलिसांकडून स्वागत करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून शांततेत व नियमानुसार उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले,आपल्या  भाषणात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अकोला जिल्ह्याच्या कावड उत्सवाच्या समृद्ध परंपरेचे कौतुक केले. कावड पालखी उत्सव हा श्रद्धा व धार्मिक परंपरेशी जोडलेला असल्याचे सांगत, उत्सवाची परंपरा जपून सामाजिक सलोखा, शांतता व बंधुभाव कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.उत्सवादरम्यान कोणतीही अडचण अथवा अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलीस मदत क्रमांक ११२ वर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्री. गजानन पडघम, उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर यांनी केले. बैठकीस अकोला शहर व जिल्ह्यातील विविध शिवमंडळांचे अध्यक्ष व सदस्य, कावड पालखीचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे ठाणेदार व पोलीस अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment