अकोला पोलीस दलाची राज्यात बाजी; CCTNS कामगिरीत प्रथम क्रमांक
प्रतिनिधी गजानन चव्हाण
गुन्हे तपासात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पारदर्शक कामकाज आणि नागरिकांना तत्पर सेवा देण्याच्या बाबतीत अकोला जिल्हा पोलीस दलाने राज्यात अव्वल कामगिरी केली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या मे २०२६ मधील CCTNS (Crime and Criminal Tracking Network System) मासिक क्रमवारीत महाराष्ट्रातील ५३ पोलीस घटकांमध्ये अकोला जिल्हा पोलीस दलाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अकोला पोलिसांनी २०१ पैकी २०१ गुण मिळवत १०० टक्के कामगिरी नोंदविली. CCTNS प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील ९७१ गुन्ह्यांची १०० टक्के नोंदणी करण्यात आली. तसेच नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती नागरिकांना Citizen Portal वर उपलब्ध करून देण्यात आली.
महिला व बालकांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये निर्धारित वेळेत १०० टक्के दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, ई-तक्रारींचेही शंभर टक्के निराकरण करण्यात आले. यासोबतच CRI-MAC, ICJS, ICIS आणि ITSSO यांसारख्या तंत्रज्ञानाधारित प्रणालींचा प्रभावी वापर करण्यात आला. अनोळखी मृतदेह व बेपत्ता व्यक्तींची ओळख पटविण्यासह गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाईसाठीही CCTNS प्रणालीचा प्रभावी उपयोग करण्यात आला.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाचा परिणाम
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली CCTNS प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. पोलीस ठाण्यांमधील अंमलदारांना नियमित प्रशिक्षण देणे, आढावा बैठका घेणे तसेच पोलीस ठाण्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाजातील अडचणी दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला.या कामगिरीसाठी CCTNS नोडल अधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हकर, सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता शिरसाट (वाघ) यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अचूक नोंदणी, पारदर्शक कामकाज आणि समर्पित सेवेमुळे अकोला जिल्हा पोलीस दलाने राज्यातील ५३ पोलीस घटकांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘सजग… सक्षम… सुरक्षित…!’ या ब्रीदाला साजेशी ही कामगिरी असल्याची भावना व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment