'मुसळधार पावसानंतर उघडीप; जुलैतच 'ऑक्टोबर हिट'चा अनुभव, शेतकरी चिंतेत'.



 (वैभव कळस )

ऐन पावसाळ्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला सलग सात दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हसळा तालुक्यात सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली होती. नद्या-नाले दुथडी भरून वाहत होते, तर शेतकऱ्यांनीही पावसाच्या जोरावर भात लागवडीच्या कामांना वेग दिला होता. त्यामुळे बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने तालुक्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. आकाशात ढगांची वर्दळ कमी झाली असून पावसाचा एक थेंबही पडत नसल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. हवेत कमालीचा उकाडा जाणवत असून जुलै महिन्यातच ऑक्टोबरमध्ये अनुभवास येणाऱ्या 'ऑक्टोबर हिट'सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता वाढल्याने रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली असून नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत आहेत. उकाडा आणि दमट हवामानामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कष्टकरी वर्गाला विशेष त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पंखे आणि वातानुकूलित यंत्रांचा वापरही वाढल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, भात लागवड पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. लागवडीनंतर पिकांच्या जोमदार वाढीसाठी नियमित पावसाची आवश्यकता असताना पावसाने विश्रांती घेतल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी शेतजमिनीतील ओलावा कमी होण्यास सुरुवात झाल्याचेही शेतकरी सांगत आहेत.

हवामानातील या अनपेक्षित बदलामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गाचे लक्ष आता पुन्हा पावसाकडे लागले असून, लवकरच दमदार पाऊस परतावा, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे

No comments:

Post a Comment