पिंपळगाव बसवंत येथे रविवारी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर'; मान्यवरांच्या उपस्थितीत विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार
प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त निफाड महसूल प्रशासनाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पिंपळगाव बसवंत येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
शिबिराचे अध्यक्षस्थान आमदार दिलीपकाका बनकर भूषविणार आहेत. यावेळी आ.सत्यजित तांबे, आ.किशोर दराडे, आ.पंकज भुजबळ, आ.गोकुळ गीते, उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्यासह पिंपळगाव बसवंतचे नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे, निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अरुंधतीताई पवार आणि ओझर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनिताताई घेगडमल, वैकुंठ पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या शिबिरात गावठाण स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, ७/१२ दुरुस्ती मोहीम, निवासी अतिक्रमण नियमितीकरण, आयुष्मान भारत कार्ड, पी.एम.किसान, रेशनकार्ड, ॲग्रीस्टॅक, बांधकाम कामगार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक कार्ड, एन.सी.एम.सी कार्ड, सेतू सेवा, ई-केवायसी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शिबिरात महसूल, कृषी, वन, भूमी अभिलेख, पंचायत समिती, महावितरण, महिला व बालविकास, आरोग्य, समाजकल्याण, बँक, पोलीस, शिक्षण, पोस्ट, नगरपरिषद, पशुसंवर्धन आदी विभागांचे माहिती व सेवा स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. निफाड तालुक्यातील नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment