'म्हसळा तालुक्यात खरीप हंगामाची तयारी पूर्ण,बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत'.

 


१६ जून २०२६.(वैभव कळस)

म्हसळा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी शेती मशागतीची व पेरणीपूर्व तयारीची बहुतांश कामे पूर्ण केली असून आता बळीराजा आकाशाकडे नजर लावून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.जून महिन्याच्या प्रारंभी काही भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी नांगरणी,कुदलणी, बांधबंदिस्ती तसेच पेरणीसाठी आवश्यक शेतीची मशागत पूर्ण केली आहे.

तालुक्यात भात हे प्रमुख खरीप पीक असून त्यासाठी लागणारे बियाणे,खते व इतर कृषी साहित्याची खरेदीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे.काही ठिकाणी भात रोपवाटिकांची तयारी पूर्ण झाली असून रुजवण झाली आहे.आता जोरदार व सातत्यपूर्ण पावसाची प्रतीक्षा सुरू आहे.पाऊस वेळेत व समाधानकारक प्रमाणात झाल्यास यंदाचा खरीप हंगाम चांगला जाईल अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.गत काही वर्षांतील अनियमित पावसामुळे शेती उत्पादनावर परिणाम झाला होता. 

त्यामुळे यावर्षी मान्सून वेळेत सक्रिय होऊन शेतीला पोषक वातावरण निर्माण व्हावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.सध्या तालुक्यातील शेतशिवारांमध्ये मशागतीची कामे पूर्ण झालेली दिसून येत असून सर्वत्र पावसाच्या स्वागतासाठी शेती सज्ज झाली आहे.या वर्षी कृषी विभागानेही शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणीचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.पावसाने पाठ फिरवली असून तालुक्यातील बळीराजा मात्र आशावादी आहे आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.


No comments:

Post a Comment