कळमनुरीतील गॅस एजन्सीवर गोंधळ, प्रशासनाची धावपळ गॅसटंचाईने नागरिकांचा संताप अनावर
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी घरगुती स्वयंपाक गॅसच्या तीव्र टंचाईमुळे कळमनुरीतील नागरिकांचा संताप गुरुवारी उफाळून आला. अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरचे बुकिंग करूनही वेळेवर पुरवठा होत नसल्याने संतप्त ग्राहकांनी शहरातील गॅस एजन्सीवर मोठी गर्दी केली. काही काळ एजन्सी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला. गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस पुरवठा विस्कळीत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. बुकिंगनंतरही आठवडाभर किंवा त्याहून अधिक काळ सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. भर उन्हात तासन्तास रांगेत उभे राहूनही रिकाम्या न हाताने परतण्याची वेळ अनेकांवर येत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
नियमित बुकिंग तरीही ग्राहकांना गॅस नाही
गुरुवारी परिस्थिती अधिकच चिघळली. गॅस मिळणार असल्याची माहिती मिळताच एजन्सीवर ग्राहकांची मोठी गर्दी झाली. वेळेवर सिलेंडर न मिळाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत व्यवस्थापनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. वाढत्या गर्दीमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढली व परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार अमोल घुगे यांनीही भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ग्राहकांनी नियमित बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याची तक्रार करत प्रशासनाने तातडीने पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली. गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

No comments:
Post a Comment