प्रभाग ११ च्या विकासाचा 'मृत्यूघंट'; निधी न मिळाल्यास नगरसेविका आशा बावणे देणार राजीनामा!



अक्षय डोंगरे प्रतिनिधी 

महागाव नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ११ च्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आशा शंकर बावणे यांनी प्रभाग विकासाच्या मुद्द्यावरून प्रशासनाच्या आणि नगराध्यक्षांच्या कारभाराविरुद्ध एल्गार पुकारला आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रभागाला सावत्रपणाची वागणूक मिळत असून, एक रुपयाचाही विकास निधी न मिळाल्याने संतप्त झालेल्या नगरसेविका बावणे यांनी थेट 'राजीनाम्याचा' इशारा दिला आहे.


सत्तापालट झाला, पण विकास मात्र 'जैसे थे'!


नगरपंचायतीच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील सत्तेची समीकरणे बदलली. सुरुवातीची सव्वा वर्षे भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची सत्ता होती, त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता आली आणि आता पुन्हा भाजपच्या नगराध्यक्षा विराजमान झाल्या आहेत. मात्र, या सर्व राजकीय उलथापालथीच्या नाट्यात प्रभाग क्रमांक ११ चा विकास मात्र 'जैसे थे' अवस्थेतच राहिला आहे


 जनतेच्या रोषाला नगरसेविका बळी; प्रशासनाला खडा सवाल?

प्रभाग ११ मधील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केली असल्याचा गंभीर आरोप आशा बावणे यांनी केला आहे. विकासकामे खोळंबल्यामुळे स्थानिक जनतेच्या तीव्र नाराजीला नगरसेविकेला सामोरे जावे लागत आहे. "जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आम्हाला सत्तेत बसवले होते, मात्र विकास निधी रोखून ठेवून आम्हाला नामोहरम करण्याचा प्रयत्न होतोय का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आता 'निधी किंवा राजीनामा' – ठाम भूमिका

"पाच वर्षे वाट पाहिली, पण आता आणखी अन्याय सहन करणार नाही," असे म्हणत नगरसेविका आशा बावणे यांनी नगराध्यक्षांना अंतिम इशारा दिला आहे. प्रभाग क्रमांक ११ साठी तातडीने विकास निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अन्यथा जनहित आणि प्रभागाच्या हितासाठी आपण आपल्या नगरसेवीकापदाचा राजीनामा देऊ, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली आहे.

या भूमिकेमुळे महागांवच्या राजकारणात खळबळउडाली असून, आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


No comments:

Post a Comment