म्हसळा खामगावात दोन गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा धडक छापा
१८ जून २०२६.(वैभव कळस)
४३ लिटर तयार दारू व रसायनासह साहित्य नष्ट,दोन जणांवर गुन्हे दाखल
पुणे येथे विषारी गावठी दारू प्राशनामुळे २५ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरात गावठी दारू निर्मितीविरोधातपोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर म्हसळा पोलिस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील खामगाव आदिवासीवाडी येथे धडक कारवाई करत दोन गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्वस्त केले.या कारवाईत तयार दारू,दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन व साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ११ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेचार व साडेसहा वाजण्याच्या सुमारास खामगाव आदिवासीवाडी येथे पोलिसांनी छापा टाकला असता सुनील नरेश वाघरे वय २५ वर्ष याच्या घराजवळ गावठी दारू निर्मितीचा अड्डा सुरू असल्याचे आढळून आले.या कारवाईत १३ लिटर गुळ व नवसागर मिश्रित पिवळ्या रंगाचे फेसयुक्त रसायन तसेच ६० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलिस शिपाई अक्षय दौलत पुरी यांच्या फिर्यादीवरून म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस बीएनएसएस २०२३ च्या कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार बोंगाणे करीत आहेत.दरम्यान दुसऱ्या कारवाईत मोतीराम बाबू पवार वय २५ वर्ष रा.खामगाव आदिवासीवाडी याच्या घराच्या आडोशाला ठेवलेल्या प्लास्टिक कॅनमधून १४ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.
सुमारे १ हजार ४०० रुपयांची ही दारू पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ८८/२०२६ दाखल करण्यात आला आहे.पोलिस शिपाई शौकत मुल्ला यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५(ई)अंतर्गत आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुणे येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हसळा पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून तालुक्यातील बेकायदेशीर दारू व्यवसायाविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याची मागणी होत आहे.संबंधित आरोपींच्या पूर्व इतिहासाचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.अधिक तपास उपपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर
एडवळे करीत आहेत.म्हसळा तालुक्यातील काही वाडीवस्तीवरगावठी दारू विक्री करणे व अडगळ पाणथळ जागी हातभट्टी दारू तयार करण्याचे अड्डे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून ते उद्वस्त करण्याची मोहीम सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

No comments:
Post a Comment