'म्हसळ्यात शिंदेसेना-काँग्रेस युतीची नवीन समीकरणे,घडायचे होते तेच घडले
(म्हसळा -बातमीदार )
नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा; काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येत सत्ता स्थापन'.-
म्हसळा नगरपंचायतीच्या राजकारणात अखेर अपेक्षेप्रमाणे मोठे सत्तांतर घडले असून नगराध्यक्ष निवडणुकीत शिंदे शिवसेनेने बाजी मारत नगरपंचायतीवर पुन्हा भगवा फडकविला आहे.काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचे शाहिद जंजिरकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शाहिद जंजिरकर यांना ९ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे यांना ६ मतांवर समाधान मानावे लागले.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नगरसेवक शिवसेनेच्या गोटात गेल्याने तो मतदान प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.१७ सदस्यसंख्या असलेल्या म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ सदस्य होते. मात्र त्यापैकी ८ नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातील एका नगरसेवकाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असला तरी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेच्या बाजूने मतदान केल्याने ९ विरुद्ध ६ अशी स्पष्ट मतांची विभागणी झाली.शिंदे सेनेत गेलेल्या माजी नगराध्यक्षा या आधीच अपात्र ठरल्याने त्यांना या निवडणुकीत सहभागी होता आले नाही.गेल्या नऊ वर्षांपासून म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र मंत्री भरत गोगावले यांच्या रणनीतीमुळे या सत्तेला सुरुंग लागल्याची चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे.या घडामोडींमुळे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांना त्यांच्या मतदारसंघात मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
श्रीवर्धन मतदारसंघात शिंदे शिवसेनेची वाढती ताकद आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे करू शकते अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.भविष्यात या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदे शिवसेना असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.नगराध्यक्ष निवडीचा निकाल जाहीर होताच शिंदे शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.
फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.निवडणूक प्रक्रिया श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांनी त्यांना सहकार्य केले.निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

No comments:
Post a Comment