“मिशन लेडी थ्राईव्ह” – एडुसन फाऊंडेशनचा महिलांच्या सक्षमीकरणासाठी अभिनव उपक्रम
नागपूर, महाराष्ट्र : एडुसन फाउंडेशनतर्फे महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी “मिशन लेडी थ्राईव्ह” हा महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील ग्रामीण, अर्ध-शहरी आणि शहरी भागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून, सुरुवातीला नागपूर जिल्ह्यात याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
या मिशन अंतर्गत महिलांच्या विकासासाठी विविध क्षेत्रांमध्ये व्यापक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये आरोग्य, मानवी हक्क आणि सामाजिक विषयांवरील जनजागृती कार्यक्रम, उद्योजकता विकास व महिला उद्योजकांना प्रोत्साहन, रोजगार निर्मिती, सायबर सुरक्षा जनजागृती, तसेच डिजिटल आणि आर्थिक साक्षरता अभियानांचा समावेश आहे. याशिवाय मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढवणे, कौशल्य विकासाला चालना देणे आणि सुरक्षित, सक्षम व समतोल समाजाची निर्मिती करणे हा आहे.
या संदर्भात एडुसन फाउंडेशनचे संस्थापक व संचालक निलेश काळे यांनी सांगितले की, “मिशन लेडी थ्राईव्ह" हा केवळ एक प्रकल्प नसून महिलांच्या आत्मविश्वास, कौशल्य आणि स्वावलंबनाला बळ देणारी एक सामाजिक चळवळ आहे. महिला सक्षम झाल्या, तर संपूर्ण समाजाचा विकास अधिक वेगाने होतो.
एडुसन फाउंडेशनने समाजातील विविध घटक, संस्था आणि नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. हा उपक्रम आत्मनिर्भर भारत, समृद्ध भारत आणि विकसित भारत या संकल्पनांशी सुसंगत असून, महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

No comments:
Post a Comment