मुंबई पोलीस भरतीमध्ये रेडगावच्या दोन युवतींची गरुडझेप: ग्रामपंचायतीतर्फे जंगी सत्कार
प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
रेडगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील होतकरू युवती कु. सोनाली सोमनाथ बिडवे आणि कु. माधुरी दत्तात्रय खुर्दळ यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल एक विशेष सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या घवघवीत यशामुळे संपूर्ण रेडगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांकडून दोन्ही रणरागिणींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रेडगाव बु ग्रामपंचायतीच्या प्रशासक वैशाली गोरख चव्हाण आणि ग्रामपंचायत अधिकारी सुभाष दत्तू जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच तंटामुक्ती उपाध्यक्ष ज्ञानेश्वर निवृत्ती चव्हाण, गोरख शांताराम चव्हाण, संतोष रामदास वाघमारे, एकनाथ श्रीराम चव्हाण, महेंद्र केदु जाधव, सोमनाथ तुकाराम बिडवे, दत्तात्रय मुरलीधर खुर्दळ आणि अण्णा कचरू केदारे आदी गावातील प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरवकार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कु. सोनाली बिडवे आणि कु. माधुरी खुर्दळ यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. "गावातील या मुलींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, केवळ स्वतःच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांचे हे यश गावातील इतर तरुण-तरुणींना नक्कीच प्रेरणा देणारे ठरेल," अशा भावना मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केल्या.गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या दोन्ही नवनियुक्त महिला पोलिसांचे सध्या सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

No comments:
Post a Comment