निफाड तालुक्यात एकाच दिवशी शिवरस्ते मोजणीचा नवा उच्चांक
प्रतिनिधी गणेश ठाकरे लासलगाव
सोमवार दि. ४ मे २०२६ रोजी निफाड तालुक्यात एकाच दिवशी तब्बल सात गावांतील शिवरस्त्यांची मोजणी पूर्ण करत प्रशासनाने नवा उच्चांक प्रस्थापित केला. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
म्हाळसाकोरे, धारणगाव, उंबरखेड, भुसे - करजगाव, दारणा सांगवी, शिंपी टाकळी तसेच हिंगणवेढे परिसरातील विविध शिवरस्त्यांचा समावेश होता. काही रस्त्यांची संपूर्ण मोजणी पूर्ण झाली, तर काही ठिकाणी अंशतः मोजणी करण्यात आली. म्हाळसाकोरे येथील भेंडाळी - वाळके वस्ती ते ढोबळे वस्ती रस्ता, धारणगाव-खडक शिवरस्ता, उंबरखेड - पिंपळगाव रस्ता यांसह अनेक मार्गांची मोजणी करताना महसूल अधिकारी, भुकरमापक, पंचायत अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दारणा सांगवी परिसरातील रस्त्यांच्या मोजणीसाठी स्थानिक पातळीवर विशेष प्रयत्न करण्यात आले. काही रस्त्यांवर अर्धवट मोजणी झाली असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन प्रलंबित असलेल्या शिवरस्त्यांच्या प्रश्नाला गती मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेत रस्ते चळवळ कृती समितीच्या वतीने विजय दरेकर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.
या उपक्रमात उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, भूमी अभिलेख उपअधीक्षक भाबड तसेच विविध मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, भुकरमापक आणि चळवळीचे पदाधिकारी यांचा सहभाग होता

No comments:
Post a Comment