'म्हसळा पंचायत समिती उपसभापती पदी लहूशेठ म्हात्रे बिनविरोध.
(वैभव कळस )
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जल्लोष, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत'.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या म्हसळा तालुक्यात पंचायत समितीच्या उपसभापतीपदी लहूशेठ उर्फ लव अंबाजी म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत ही निवड प्रक्रिया पार पडली.
पंचायत समिती उपसभापती पदासाठी लहू म्हात्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सचिन खाडे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरीत्या घोषित केले.या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
म्हसळा पंचायत समितीत चार सदस्य संख्या असून सभापतीपदी बबन मनवे कार्यरत आहेत. खासदार सुनिल तटकरे यांच्या आदेशाने लहू म्हात्रे यांना उपसभापती पदाची संधी मिळाल्याचे सांगण्यात आले.निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अनंभिनंदन केले.पंचायत समिती ते छत्रपती शिवाजी चौक पर्यंत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत फटाक्यांची आतषबाजी केली.
यावेळी तालुका अध्यक्ष समीर बनकर,सभापती बबन मनवे, पंचायत समिती सदस्या प्रियंका निंबरे,सदस्या समृद्धी चाचले,माजी सभापती अनिता खडस, माजी सभापती छाया म्हात्रे, नगर सेविका जयश्री कापरे,ज्येष्ठ नेते अंकुश खडस,लक्ष्मण कांबळे,मयूर खैरे,महिला अध्यक्षा मीना टिंगरे,महिला शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर,गणाध्यक्ष नाना सावंत,मोरेश्वर पाटील,प्रसन्न निंबरे,महेश घोले,किरण पालांडे, प्रकाश गाणेकर,शेखर खोत,नवाब कौचाली,श्री दळवी,सरपंच फारुकभाई हजवाणे,अनिल टिंगरे,आक्रमभाई साठविलकर,यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसभापती लहूशेठ म्हात्रे यांच्या निवडीमुळे पंचायत समितीच्या कामकाजाला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment